अनुकंपा भरतीचा विशेष आदेश काढावा
By Admin | Updated: May 23, 2015 00:35 IST2015-05-22T21:47:55+5:302015-05-23T00:35:24+5:30
एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदांवर अनुकंपा उमदेवारांची नियुक्ती करण्यात येत असल्याने वर्षाकाठी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी भरती देखील होत नाही

अनुकंपा भरतीचा विशेष आदेश काढावा
कोयनानगर : अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती करताना एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याचा निर्णय २००५ मध्ये राज्य शासनाने घेतला. त्यानुसार अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची संख्या कमी न होता ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले, यामुळे उमेदवारांवर अन्याय होत असून, याबाबत विशेष शासन आदेश काढावा, अशी मागणी होत आहे.
दि. २२ आॅगस्ट २००५ चा शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये कोणतीही मर्यादा नव्हती. त्यामुळे ज्या कार्यालयांमधील पदे रिक्त होतील त्या कार्यालयाच्या मागणीनुसार आणि प्रतीक्षासूची वरच्या ज्येष्ठतेनुसार अनुकंपा उमेदवार नोकरभरती होत होती आणि पर्यायाने अनुकंपा उमेदवारांना फारकाळ प्रतीक्षा करावी लागत नव्हती. दि. २२ रोजीच्या शासन निर्णयामुळे एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदांवर अनुकंपा उमदेवारांची नियुक्ती करण्यात येत असल्याने वर्षाकाठी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी भरती देखील होत नाही आणि पर्यायाने प्रतीक्षासूची कमी होण्याऐवजी वाढत निघाली.
काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांची नावे प्रतीक्षा सूचीतून कमी होताना निदर्शनास आले. प्रतीक्षा सूचितील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना न्याय मिळणे गरजेचे असताना सरळ सेवेतून अनुकंपा तत्त्वावर भरती झाल्याने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या या रखडल्या गेल्या. त्यामुळे अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास उमेदवारांच्या निदर्शनास आले. आता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाप्रमाणे राज्य शासनाने लवकर नवीन शासन निर्णय निर्गमित करावे. २०१० पूर्वीच्या सर्व प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची टप्प्याटप्प्याने भरती करण्याचा निर्णय घ्यावा. (वार्ताहर)