झाडाखालच्या आंब्याचीही दखल घ्या, अन्यथा...
By Admin | Updated: May 26, 2014 01:03 IST2014-05-26T00:49:28+5:302014-05-26T01:03:53+5:30
कृषी विद्यापीठाचा इशारा : आंबा बागायतदारांना विद्यापीठाचा ‘हाय अॅलर्ट’

झाडाखालच्या आंब्याचीही दखल घ्या, अन्यथा...
शिवाजी गोरे - दापोली आंब्याचा राजा हापूस कोकणातील मुख्य पीक म्हणून ओळखला जातो. कोकणातील शेतकर्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे हे पीक अलिकडच्या काळात आंबा बागायतदारांच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात येवू लागले आहे. हंगामादरम्यान खराब आंबे झाडाखाली फेकले जातात किंवा सरतेशेवटी काही आंबे झाडावर सोडून दिले जातात. त्या आंब्यात अळी तयार होते. आंब्यातील अळी जमिनीत कोष तयार करते व पुढील वर्षीच्या हंगामात हीच अळी धोक्याची घंटा बनू शकते. त्यामुळे आंबा बागायतदाराने झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्याचा ‘हायअॅलर्ट’ दापोली कोकण कृषी विद्यापीठाने बागायतदारांना दिला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आंब्यावरील संशोधन व काढणी पश्चात व्यवस्थापनावर अभ्यास करीत आहेत. आंब्यावरील रोग व बागायतदारांना उद्भवणार्या समस्या याबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करीत आहे. हापूस आंब्यावर करपा किड व फळमाशीचा वारंवार प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी व मोहोर आल्यावर वेळोवेळी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यापीठाकडून शेतकर्यांना सल्ला देण्यात येतो. फळधारणा झाल्यापासून तर आंबा काढणीपर्यंत शेतकर्यांना सल्ला देण्यात येतो. त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. मात्र आंबा काढणीनंतरसुद्धा काळजी घ्यावयाची असते. याबाबत शेतकर्यांना विसर पडू लागला आहे. आंबा हंगामात खराब फळे झाडावरुन खाली पडतात. त्या फळात किडरोग तयार होवून त्यामध्ये अळी तयार होते. ती अळी कालांतराने जमिनीत कोष तयार करते व जमिनीखाली रोगजंतू तयार होतात. ते रोगजंतू पुन्हा कालांतराने आंब्याच्या झाडावर येतात. काहीवेळा हंगामाच्या शेवटी कच्ची फळे झाडावर ठेवली जाते. ती फळे झाडावर पिकून खाली पडतात. झाडाखाली त्यांच्यात रोगजंतू तयार होतात. झाडाखाली पडलेला आंब्याचा खच तयार होतो. त्यातून रोगाची निर्मिती होते. त्यामुळे आंबा पीक घेण्यापूर्वी व आंबा पीक घेतल्यानंतरसुद्धा शेतकर्याने झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. आंबा काढणी पश्चात व्यवस्थापनसुद्धा तितकेच महत्वाचे असल्याने शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना आंबा बागांची काळजी घेण्यासाठी प्रबोधन सुरु केले आहे. हापूस तयार होण्यापूर्वी त्याची कातडी पातळ व नरम होवू लागतात. फळमाशीचा प्रादुर्भाव होवू लागतो. फळमाशी आंब्याला छिद्र पाडून त्यात २०० ते ३०० अंडी घालते. अंडी दोन ते तीन दिवसात उबळून त्यात अळी तयार होते. आंब्यातील गर असेपर्यंत १२ ते १५ दिवस त्या अळ्या आंब्यातच असतात. त्यानंतर मात्र त्या जमिनीत जातात व कोष तयार करुन जमिनीत रहातात. तेथेच रोगाचे केंद्र निर्माण करतात. त्यामुळे आंब्याच्या झाडाखालची जागा झाडून कचरा गोळा करुन जाळून टाकणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.