बाप्पा येणार महागाई घेऊन
By Admin | Updated: June 23, 2014 01:33 IST2014-06-23T01:17:42+5:302014-06-23T01:33:43+5:30
चाहुल गणेशोत्सवाची : यंदाही मूर्तींचे दर वाढण्याची चिन्हे

बाप्पा येणार महागाई घेऊन
रत्नागिरी : सर्व भक्तांना वर्षभर प्रतीक्षा करावा लागणारा गणेशोत्सव अवघ्या दीड दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. मूर्तिशाळेमध्ये मात्र कामाची लगबग सुरू झाली आहे. देशात बोकाळलेल्या महागाईची झळ बाप्पांना बसू शकते. वाढते इंधनदर, मजुरी, रंग, मातीचे दर वधारल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वर्षभर भक्तगण गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहात असतात. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव २९ आॅगस्ट पासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकार अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ करतात. प्रामुख्याने शाडूच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याने शाडूची माती गुजरातमधून मागवावी लागते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी गतवर्षी २०० ते २२५ रूपयांना मिळणारे शाडूच्या मातीचे पोते यावर्षी २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येत आहे.
भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मात्र, मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. मात्र, ग्रामीण भागात सध्या संबंधित कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो.
शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. महागाईमुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. याशिवाय रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीचे दर यावर्षी वाढणार हे नक्की आहे.
सव्वा इंचापासून चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटापासून दहा बारा फुटी असते. मुंबई, पुणे यांसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळांमध्ये चुरस लागते. बहुधा मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलविताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करण्यास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकनमातीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)