अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करा
By Admin | Updated: February 28, 2016 00:59 IST2016-02-28T00:59:23+5:302016-02-28T00:59:23+5:30
जे. पी. जाधव : अनुसूचित जाती - जमातीं योजनेच्या निधीचा गैरवापर

अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करा
मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपयोजना निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी समाजकल्याण मंत्री बडोले यांच्याकडे दिले आहे.
महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री बडोले यांनी आमदार भाई गिरकर यांच्यासमवेत दापोलीतील वणंद व मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी भेट दिली. यावेळी आरपीआय (ए) रत्नागिरीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याशी रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती -जमातींच्या विकास योजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काही योजनांतील निधीचा गैरवापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आरपीआय (ए) च्यावतीने आणून देण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रामुख्याने रमाई आवास व इंदिरा आवास योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पथदीप उर्जीकरण, ग्रामपंचायतीतील १५ टक्के विकासनिधी केवळ मागासवर्गीयांवर खर्च करणे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते विकास निधीचा गैरवापर, भारत सरकारच्या जनगणना योजना २०११ मध्ये बौद्ध समाजावर झालेला घोर अन्याय, कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील इमारत क्र. २ मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या ग्रंथ संपदेसह संगणक सुविधा उपलब्ध करणे, जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतीगृहाचे बांधकाम करणे, अनुसूचित जातीतील व्यावसायिक व उद्योजक यांना कृ षी व पर्यटनांतर्गत तसेच अन्य उद्योग, व्यवसाय व सर्वांगीण विकास यांच्यासाठी अत्यल्प दराने कर्जपुरवठा करणे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे जमिनीचे ७/१२ त्वरित मिळणे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्य पदाधिकारी दादासाहेब मर्चंडे, जिल्हा संघटक धनेश रुके, सरचिटणीस प्रीतम रुके, जिल्हा युवक अध्यक्ष आदेश मर्चंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकशीचे संकेत : रत्नागिरीत प्रकार उघड
रत्नागिरी जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातींच्या विकास योजनांवरील निधीचा गैरवापर झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. रत्नागिरीत हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामांची चौकशी होण्याचे संकेत आहेत.