वाहनतळ आरक्षित जागेत मंडप उभारणी
By Admin | Updated: January 14, 2015 00:32 IST2015-01-13T23:54:52+5:302015-01-14T00:32:24+5:30
उक्ताड येथील आरक्षण : राखीव जागेवर पार्ट्यांचा धुमाकूळ, प्रशासनाला सवाल

वाहनतळ आरक्षित जागेत मंडप उभारणी
चिपळूण : शहरातील उक्ताड येथील आरक्षण क्रमांक ३४ ही जागा वाहन तळासाठी राखीव असून, या जागेवर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली आहे. काही लोकांनी राजरोसपणे मंडप उभारुन लग्न पार्ट्या, मेहंदी अशा कार्यक्रमाची तयारी केली आहे. नगर परिषदेची आवश्यक ती परवानगी घेऊनच अशा प्रकारचे कार्यक्रम आखावेत, असे शिवसेनेच्या नगरसेविका सुरेखा खेराडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी या जागेवर झोपडी बांधून आयुर्वेदिक दवाखाना थाटण्यात आला होता. त्यानंतर आता मंडप घालण्याचे काम सुरु आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनाही कल्पना देण्यात आली आहे. परंतु, नेहमीप्रमाणे प्रशासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक मुख्याधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी होती. त्यांनी हा विषय गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा या जागेवर मंडप उभारण्याचे काम चालू आहे. या प्रकाराबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
नगर परिषदेने वाहनतळासाठी जागा साफ केली की, खासगी वापरासाठी, असा सवालही नागरिकांतून केला जात आहे. या मंडप उभारणीबाबत नगर परिषदेकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे अभियंता पवार यांनी सांगितले. मग कोणाच्या आशीर्वादाने येथे हा मंडप उभारला जात आहे, असा सवाल खेराडे यांनी केला.
नगरपरिषदेने वाहनतळासाठीच ही जागा साफ केली असून, आरक्षण त्यासाठीच हवे, असा आग्रह खेराडे यांनी धरला आहे. (वार्ताहर)
शहरामध्ये आरक्षित जागेवर नगर परिषदेतर्फे सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सभेमध्ये करण्यात आली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या ठिकाणी एखादा कार्यक्रम असेल, तर मंडप घालण्यास विरोध नाही. मात्र, नगर परिषदेचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान न करता रितसर परवानगी घेऊन कार्यक्रम करावेत. त्याला माझा कोणताही विरोध नाही, असे सुरेखा खेराडेंनी सांगितले. आरक्षित जागेवर नगरपरिषदेने सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.