कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणा
By Admin | Updated: September 7, 2014 00:34 IST2014-09-07T00:28:28+5:302014-09-07T00:34:53+5:30
प्रमोद शेवाळे : सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय करणार नाही

कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणा
चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणीही आतताईपणा केला किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवून सामाजिक स्वाथ्याच्या हितास बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. परिस्थितीनुसार निर्णय घेवून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा अप्पर पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिला.
अप्पर पोलीस अधिक्षक शेवाळे यांच्याकडे निवडणूक व गणेशोत्सव काळातील जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व खेडचा काही भाग हा संवेदनशील आहे. याबाबतची माहिती आपण घेत आहोत. जिल्ह्यातील हिस्ट्रीसिटर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची माहिती घेवून त्यानुसार परिणामकारक कारवाई केली जाईल. ही कारवाई पारदर्शक असेल. विनाकारण कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. निवडणुकीच्या काळात आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधिल असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या काळात आता बरीच सुधारणा झाली आहे. रात्री १० वाजता प्रचार संपतो किंवा ध्वनीप्रदूषणाचा विचार करुन ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनाही त्याची सवय लागली आहे. निवडणुकीच्या काळात क्रियाशील कार्यकर्ते किंवा अगदी पोलिंग एजंट कोण याचीही माहिती घेवून त्याचा इतिहास तपासला जाईल. म्हणजेच अगदी ‘ग्रासरुट’पर्यंत पोलीस खाते काम करील. हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाई, नोटीसा अशा आयुधांचा वापरही पोलीस खाते करणार आहे.
आपण धुळे, गडचिरोली, मालेगाव, नाशिक अशा भागात काम केले आहे. तेथील अनुभव आपल्या पाठीशी आहे. निवडणुकीच्या काळात एखादा निर्णय कठोरपणे घेताना पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसेल. कारण या खात्यात काम करताना सर्वप्रकारची तयारी ठेवावी लागते. शिवाय गडचिरोली ते सिंधुदुर्ग या पलिकडे कोणी पाठविणार नाही त्यामुळे आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करु. निवडणुका शांततामय वातावरणात पार पडतील असा विश्वास अप्पर पोलीस अधिक्षक शेवाळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)