सायबर गुन्हे राेखण्यासाठी राजापूर अर्बन बँकेत ‘सीम टेक्नाॅलाॅजी टूल्स’प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:09+5:302021-03-23T04:33:09+5:30
राजापूर : वाढत्या सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. राजापूर अर्बन को-ऑप. बँकेकडूनेही ...

सायबर गुन्हे राेखण्यासाठी राजापूर अर्बन बँकेत ‘सीम टेक्नाॅलाॅजी टूल्स’प्रणाली
राजापूर : वाढत्या सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. राजापूर अर्बन को-ऑप. बँकेकडूनेही सायबर सुरक्षिततेबाबत अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून, विशेष सायबर सुरक्षेसाठी बँकेने ‘सीम टेक्नॉलॉजी टूल्स’ म्हणजेच ‘सेक्युरिटी इन्फर्मेशन इव्हेंट मॅनेजमेन्ट’ ही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. या सुविधेद्वारे बँकेच्या डेटा सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली आहे. ही प्रणाली वापरणारी राजापूर अर्बन बँक ही कोकणातील पहिली बँक ठरणार आहे.
या सायबर सुरक्षेसाठी राजापूर अर्बन बँकेने लुमिवर्स सोल्युशन नाशिक या कंपनीशी करार केला आहे. एप्रिल २०२१ पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात बँकेत ही सुरक्षित प्रणाली कार्यान्वित होणार आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली असून, लुमिवर्स सोल्युशन नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर ठाकरे यांनी याबाबत प्रात्यक्षिक देऊन या सुरक्षित प्रणालीबाबत माहिती दिली आहे.
बँकेने यापूर्वीच सायबर सुरक्षिततेसाठी बँकेचा डेटा हा क्लाऊड बेस पद्धतीने ईएसडीएस या नाशिक येथील कंपनीकडे नियंत्रणासाठी दिलेला आहे. संगणक विभागाच्या अधिकच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेच्या प्रधान कार्यालयात स्वतंत्र संगणक विभाग व डेटा सेंटर उभारून तीन शिप्टमध्ये २४ तास लक्ष केंद्रित केले आहे. सीम टेक्नॉलॉजी टूल्स म्हणजेच सेक्युरिटी इन्फर्मेशन इव्हेंट मॅनेजमेन्ट या सुरक्षेअंतर्गत बँकेच्या एकूणच संगणक डेटा सिस्टिममध्ये कोण हॅकर्स अनधिकृतपणे प्रवेश करीत असेल तर त्याची तात्काळ माहिती बँकेला मिळणार आहे. जर याबाबत माहिती देऊनही बँकेकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तर ही नवीन सुरक्षा यंत्रणा अशा हॅकर्सना तात्काळ ऑटोमॅटिक ब्लॉक करणार आहे.
तसेच बँकेच्या कोणत्याही शाखेत वा परिसरात मोबाइल, लॅपटॉप वा अन्य यंत्रणेमार्फत बँकेच्या डेटाप्रणालीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्यास तो तात्काळ रोखण्याचे कामही यंत्रणा करणार आहे. बँकेच्या संगणक वा लॅपटॉपवर कोणत्याही प्रकारे बाहेरील व्यक्तीचा पेनड्राइव्ह वा अन्य साहित्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्यास तो रोखण्याचे काम ही यंत्रणा करणार आहे, तर बँकेच्या एकूणच कार्यप्रणालीमध्ये कार्यरत असलेले संगणक, लॅपटॉप व संगणकप्रणालीशी जोडलेल्या यंत्रणेमध्ये व्हायरस आला असेल वा ती काम करण्यास सक्षम नसेल तर ही नवीन सुरक्षा यंत्रणा अशा यंत्रणेला ॲटोमॅटिक बाजूला करणार आहे, अशी माहिती अभ्यंकर व अहिरे यांनी दिली.