प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड
By Admin | Updated: June 28, 2014 00:31 IST2014-06-28T00:24:04+5:302014-06-28T00:31:51+5:30
अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच धावाधाव अधिक...

प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड
रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून आजपासून अकरावी प्रवेश अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे वेबसाईट खुली न झाल्यामुळे सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसून येत होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीसाठी जिल्ह्यात २१ हजार ७४० इतकी प्रवेश क्षमता आहे. शिक्षण विभागाने २७ ते २९ जूनपर्यंत प्रवेश अर्ज वितरणाचे नियोजन केले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात स्वयंअर्थसहायित नवीन १७ महाविद्यालये सुरू होणार आहेत. शिवाय १० ते १२ तुकडीवाढीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज वितरण सुरू असल्याने अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. शिवाय आयटीआय व पॉलिटेक्निकलचे प्रवेश आॅनलाईन पध्दतीने सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी झालेली दिसून येत होती. आयटीआयची वेबसाईट बंद असल्यामुळे पालक - शिक्षक ताटकळत उभे होते.
२७ ते २९ जून या कालावधीत प्रवेश अर्जांचे वितरण केले जाणार आहे. ३० जून ते २ जुलैअखेर प्रवेश अर्जांची छाननी, गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
दि. ४ ते ८ जुलै रप्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ९ व १० रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रवेश दिले जाणार आहेत. ११ व १२ रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १४ व १५ रोजी रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. १६ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत होते. ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. (प्रतिनिधी)