चिपळुणातील प्राैढाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:45+5:302021-06-30T04:20:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील पाग नाक्यावर कापसाळ फणसवाडी येथील तरुण महेश कांबळी (४२) हा सोमवारी मृतावस्थेत आढळल्याने ...

चिपळुणातील प्राैढाचा संशयास्पद मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील पाग नाक्यावर कापसाळ फणसवाडी येथील तरुण महेश कांबळी (४२) हा सोमवारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, तो कापसाळ येथून पाग नाक्यावर कसा पोहोचला, तो नेमका कसा भाजला, असे प्रश्न त्याच्या नातेवाइकांनी उपस्थित केले आहेत. नातेवाइकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून, त्यानुसार पोलीस कसून चौकशी करत आहेत.
शहरालगतच्या कापसाळ फणसवाडी येथील महेश कांबळी याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी पाग नाका येथील एका गॅरेजसमोर जखमी अवस्थेत आढळला. त्याचा एक पाय पूर्णपणे भाजलेला होता. तर दोन्ही हाताला मारहाण झाल्याच्या खुणा दिसत होत्या. त्याच दुचाकी रस्त्यावर व्यवस्थित उभी होती. प्रथमदर्शनी ही वस्तुस्थिती पाहता हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घातपात असून आरोपीला तत्काळ अटक करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांबरोबर चर्चा करून तपासाअंती जे समोर येईल त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वसित करत ग्रामस्थांना शांत केले.
शवविच्छेदानंतर मध्यरात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी रात्रीच या संदर्भात पंचनामे करत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मयतच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच परिसरात सुरू असलेल्या चर्चेचा कानोसा घेता महेश हा एकदम साधा आणि सरळ तरुण होता. भांडणे, मारामारी दुष्मनी हा त्याचा अजिबात विषय नव्हता. परंतु त्याला मद्याचे वेसन होते. चिपळूण शहरातील एका खासगी गाडीवर तो चालक म्हणून काम करत होता. सोमवारी नेहमीप्रमाणे तो कामावर आला. परंतु सोमवार असल्याने काम बंद ठेवून त्याला सुट्टी देण्यात आली होती. सुट्टी असल्याने मी शेतात लावणीच्या कामाला जातो असे मालकाला सांगून तो निघून गेल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तो शेतात न जाता मित्रांबरोबर मासे पकडण्यासाठी गेला होता. दुपारी १२ वाजेपर्यंत त्याचा फोनही सुरू होता. त्यानंतर मात्र कोणाबरोबर गेला, याबाबत कोणाकडेच माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.