संगमेश्वरातील जमिनीची भूवैज्ञानिकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:30+5:302021-09-13T04:29:30+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील निनावे, निवधे, ओझरे परिसरात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील रस्ते व आजूबाजूच्या भूभागाला मोठ्या ...

संगमेश्वरातील जमिनीची भूवैज्ञानिकांकडून पाहणी
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील निनावे, निवधे, ओझरे परिसरात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील रस्ते व आजूबाजूच्या भूभागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. या जमिनीची भूवैज्ञानिकांकडून पाहणी करण्यात आली. या भेगा कशामुळे पडल्या याचा अहवाल लवकरच देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २२ जुलै राेजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर तालुक्यालाही बसला. या पावसामुळे तालुक्यात माेठ्या प्रमाणात हानी झाली. या पावसामुळे तालुक्यातील निनावे, निवधे, ओझरे परिसरातील जमिनींना भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे काही घरांना धाेकाही पाेहाेचला आहे. जमिनीला पडलेल्या भेगांची भूवैज्ञानिकांकडून पाहणी करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत हाेती. त्यानुसार भूवैज्ञानिकांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली.
भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षण खाण मंत्रालय राज्य इकाई महाराष्ट्र पुणे येथील वरिष्ठ भू वैज्ञानिक भूषण कुथे, भूवैज्ञानिक सैकत रॉय यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी कोंडगाव मंडल अधिकारी नारायण चौधरी, ओझरे तलाठी संतोष वाघधरे, निवधेचे तलाठी राम खडके, साखरपा येथील तलाठी संजय पवार, शिवकुमार दळवी, प्रकाश उंडे उपस्थित होते.