पोलीसच बनताहेत ज्येष्ठ नागरिकांची आधार काठी

By Admin | Updated: December 31, 2015 00:36 IST2015-12-30T23:04:09+5:302015-12-31T00:36:52+5:30

प्रमोद मकेश्वर : वृध्दांना वाटू लागला पोलिसांचा आधार

The support staff of senior citizens are being formed by the police | पोलीसच बनताहेत ज्येष्ठ नागरिकांची आधार काठी

पोलीसच बनताहेत ज्येष्ठ नागरिकांची आधार काठी

चिपळूण : नोकरी धंद्यानिमित्त मुले परगावी असतात, ज्यांना मुलेच नाहीत किंवा जवळचे नातेवाईकही नाहीत, अशा एकाकी जीवन जगणाऱ्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळावा, आपली काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे, याची जाणीव व्हावी व त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळावे, यासाठी पोलीस दलातर्फे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेतला व त्यांना आधार दिला. तुमच्यामुळे आम्हाला धीर आला असून, एक आधार मिळाला असल्याची कृतज्ञतेची भावना येथील उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.पोलीस वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेऊन मकेश्वर यांनी एकाकी जीवन जगत असलेल्या वयोवृध्दांना पोलीस दलातर्फे दत्तक घेण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन सर्व वयोवृध्दांचे स्वागत करण्यात आले. पोलीस केवळ दंडुका घेऊन कायदा राबवण्यासाठी नसून, त्यांनाही सामाजिक बांधिलकी आहे. यातूनच हा उपक्रम सुचला आहे. तो यशस्वी करण्यासाठी पोलीस, अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीसपाटील, सामाजिक संस्था, पोलीस मित्र व काही नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या सोडवण्याची जबाबदारी आमची आहे, असे मकेश्वर यांनी सांगितले. तुमची काळजी घेण्याबरोबरच अनेकदा मालमत्ता लुबाडण्याच्या उद्देशाने वयोवृध्द नागरिकांना काहीही माहिती न देता सह्या वा अंगठे घेण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांवरही आमची करडी नजर राहणार आहे. तुम्हाला बँकेतून एटीएम बंद झाल्याचा दूरध्वनी येऊ शकतो किंवा दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने कोणीही घरात प्रवेश करू शकतो. यातून आपली फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा व त्याची माहिती द्यावी आणि त्यानंतरच त्यांच्या सूचनेप्रमाणे वागावे, असे आवाहन त्यांनी केले. हे कलियुग आहे. यात चांगले कमी व वाईट जास्त घडते. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात वृध्दांवर हल्ले होतात. त्यामुळे आम्हीही भयभीत असून, पोलिसांच्या रुपाने आम्हाला दिलासा मिळाला असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. यावेळी वृध्दांना नोंदी ठेवण्यासाठी वह्यांचे वाटप करण्यात आले. मुले असतानाही आई - वडिलांना वृध्दाश्रमात ठेवल्यानंतर त्यांची काय अवस्था असते, याबाबतची कविता बांधकाम व्यावसायिक नाझिम अफवारे यांनी सादर करताच अनेकांचे डोळे भरून आले. यावेळी रामचंद्र मोरे, तुकाराम कासार, रामचंद्र सकपाळ, बारकू मोहिते, अशोक रेडीज, बबन करंजकर, किशोर सुर्वे, गुरुलिंग जंगम, सरस्वती पडवेकर, अनघा गोताड, गीता चव्हाण, सुनंदा सकपाळ, खतिजा खान, दीपाली जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक सुहास वाकचौरे, उपनिरीक्षक सचिन शेळके, उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव, गणेश नाळे, पप्या चव्हाण, अमोल यादव उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The support staff of senior citizens are being formed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.