दापोलीतील सागरीकिनारे सुनेसुने

By Admin | Updated: January 5, 2016 00:23 IST2016-01-05T00:23:20+5:302016-01-05T00:23:20+5:30

जादा सुट्ट्यांची वानवा : नववर्षाच्या स्वागताकडे पर्यटकांची पाठ; मार्गशीर्षचा परिणाम

SuneSune, along the coastline of Dapoli | दापोलीतील सागरीकिनारे सुनेसुने

दापोलीतील सागरीकिनारे सुनेसुने

दापोली : सरत्या वर्षाच्या अखेरीला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दापोली तालुक्यात बहुसंख्येने पर्यटक येतात. या पर्यटकांना राहण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिकांना रूम उपलब्ध करणे कठीण होऊन बसते. मात्र, यंदा सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जादा सुट्ट्या मिळाल्या नसल्याने पर्यटकांनी नवीन वर्षाच्या स्वागताकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
यावर्षी नाताळ सणानिमित्त दापोलीतील समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाली होती. या गर्दीमुळे गाडी फिरवणेही कठीण बनले होते. परंतु, ३१ डिसेंबर रोजी मात्र २५ टक्केच पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागताला हजेरी लावली होती. नेहमी पर्यटकांनी हाऊसफुल्ल होणारी हर्णै, मुरूड, कर्दे, पाळंदे अशी अनेक सागरी गावे चक्क पर्यटकांअभावी ओस पडली होती. सागरकिनारी असणारी हॉटेल्स केवळ २० टक्केच फुल्ल होती. तर घरगुती जेवण आणि निवास व्यवस्थेकडे ५ टक्के पर्यटकच आले असल्याची माहिती मुरूड येथील हॉटेल व्यावसायिक विवेक भावे यांनी दिली. रोजच्या जीवनात थोडसं ‘टेन्शन फ्री’ व्हावं यासाठी पर्यटक ३१ डिसेंंबरचा मुहूर्त काढून पर्यटनासाठी येतात. कोकणात आल्यावर त्यांना कोकणी पध्दतीचे चिकन, मासे असे जेवणाची लज्जत वाढवणारे पदार्थ आवर्जून लागतात. तर सकाळी नाष्ट्यासाठी उकडीचे मोदक, घावण अशा प्रकारच्या खास कोकणी पदार्थांची ते मागणी करतात.
सरत्या इंग्रजी वर्षाला ‘गुड बाय २०१५’ करायला आणि ‘वेल कम टू २०१६’ असे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वयोवृध्दांपासून ते युवावर्गापर्यंतचे पर्यटक दापोलीत येऊन मौजमजा करतात. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने गुरूवारी महालक्ष्मीचे व्रत अनेक कुटुंबातील महिला आवर्जून करतात. कोकणात आल्यानंतर चविष्ट अशा कोकणी खाण्यावर ताव मारल्याशिवाय पर्यटकांना राहवत नाही. दापोलीत येणारे बहुतांशी पर्यटक हे पुणे, मुंबई, सातारा, सांगली अशा ठिकाणाहून येत असतात. यामध्ये शासकीय कर्मचारी जास्त प्रमाणात असतात. यंदा केवळ ३१ डिसेंबर रोजी सुटी असल्याने आणि १ जानेवारीला जादा सुटी नसल्याने यंदा नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे येथील गजबजलेले सागरकिनारे ओस पडले होते. ३१ डिसेंबरला येथे येणारे काही पर्यटक हे मद्यपीही असतात. त्यामुळेच कोणी मद्यप्राशन करून भानगडी करू नये, आनंदात थर्टीफस्ट साजरा व्हावा यासाठी दापोली पोलीस काळजी घेत असतात. याहीवर्षी दापोली पोलिसांनी योग्य नियोजन करून समुद्रकिनारी आपली गस्त ठेवली होती. थर्टीफर्स्टला नेहमी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर यावर्षी मात्र तुरळक पर्यटकांनी हजेरी लावली होती. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाल्याचे जाणवत होते. (प्रतिनिधी)
मिनी महाबळेश्वर : नववर्षाला उलटे चित्र
दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात थंडीचा पारा १० अंशांपर्यंत येतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची वेगळी ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत चालली आहे. नववर्षाला हे चित्र उलटे असल्याचे दिसून आले.

Web Title: SuneSune, along the coastline of Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.