रविवार ठरला शहर स्वच्छतेचा वार
By Admin | Updated: November 16, 2014 23:33 IST2014-11-16T22:05:51+5:302014-11-16T23:33:53+5:30
खेड तालुका : धर्माधिकारी प्रतिष्ठानला नागरिकांचीही साथ

रविवार ठरला शहर स्वच्छतेचा वार
खेड : जिल्ह्याप्रमाणेच रविवारी खेडमध्येही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि खेडमधील नागरीक देखील सहभागी झाले होेते़
नगरपालीकेच्यावतीनेही शहरात ठिकठिकणी स्वच्छता करण्यात आली. एवढेच नव्हे तर स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आपले स्वच्छता अभियान राबविल्याने शहरात केवळ स्वच्छता केल्यानंतरचे कचऱ्याचे ढिग दिसत होते. हे ढिग नंतर नगरपालिकेच्या वाहनाने कचरा डेपोकडे नेण्यात आले. रविवार असल्याने शहरात एकाचवेळी हे अभियान राबविल्याने शहरात सर्वत्र रविवार हा स्वच्छता वार असल्याचेच चित्र दिसून आले़
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने खेडमध्ये सकाळी ८ वाजता या अभियानास प्रारंभ झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छतादूत म्हणून धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. एसटी बसस्थानक, पोलीस स्थानक परिसर तसेच खेड शहरातील उर्वरीत सर्व प्रभागात या प्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
यावेळी नगरपालिकेची वाहनदेखील तैनात करण्यात आली होती. पोलीस स्थानके, सरकारी कार्यालये, जगबुडी नदीकिनारी तसेच बाजारातील मोक्याची ठिकाणे यावेळी स्वच्छ करण्यात आली़ याशिवाय शिवतर मार्गावरील बराचसा भाग स्वच्छ करण्यात आला़ याप्रसंगी स्टेट बँक कर्मचारीदेखील मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)