निष्पाप समताच्या आत्महत्येचे गूढ कायम
By Admin | Updated: July 30, 2015 00:27 IST2015-07-29T22:18:31+5:302015-07-30T00:27:23+5:30
अधुरं स्वप्न : वकिलीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणीची दुर्दैवी अखेर

निष्पाप समताच्या आत्महत्येचे गूढ कायम
आरवली : माखजनजवळ गडनदीमध्ये कॉलेज तरुणी समता भायजे हिने आत्महत्या करण्यामागचे कारण काय, असे कोडे आता ग्रामस्थांना पडले आहे. शिक्षण घेऊन वकील होण्याची इच्छा असणाऱ्या समता भायजे हिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार का आला, असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. समताच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर घरी तिचे साठ वर्षे वयाचे वडील श्रीपत, भाऊ श्रीकांत असेच राहात होते. तिच्या पूजा या बहिणीचे चिपळूण तालुुक्यातील असुर्डे येथे लग्न झाले असून, ती सासरी असते. यंदाच समता हिने बारावीची परीक्षा माखजन येथील अॅड. पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतून उत्तीर्ण केली होती. तिला शिक्षण घेऊन वकील व्हायचे होते, यासाठी तिने सावर्डे येथील कॉलेजमध्ये पाच दिवसांपूर्वीच प्रवेश घेतला. घरची परिस्थिती तशी हलाखीची होती.भाऊ गावात बांधकामाची कामे करतो. कॉलेज करुन घरातील सगळी कामे ती स्वत:च करीत असे. समताचे पुढील शिक्षणही चांगले व्हावे व ती स्वत:च्या पायावर उभी राहावी, यासाठी तिचे चुलते गणपत भायजे यांनी पुढाकार घेतला होता. सावर्डे येथे कॉलेजात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश मिळाल्यावर तिने कॉलेजमध्ये जाण्यास सुरुवात केली. शुक्रवारी ती सकाळी घरातील जेवण वगैरे उरकून आपला डबा घेऊन कॉलेजला रवाना झाली. शुक्रवारी तिने नेलेला जेवणाचा डबा कॉलेजमध्ये खाल्ला. कॉलेज सुटल्यावर ती घरी धामापूर येथे निघाली. असुर्डे येथे ती आपल्या बहिणीकडे गेली. तिने बहिणीच्या मुलांना खाऊही दिला आणि घरी यायला निघाली. माखजनपासून धामापूरकडे जाण्यासाठी ठराविकच गाड्या असल्याने ती दुपारी माखजनपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आपल्या भायजेवाडीतील घराकडे चालत निघाली. माखजनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यालगतच गडनदीचा डोह आहे. या ठिकाणच्या देवस्थानजवळ आल्यावर तिने तेथे आपले दप्तर जमिनीवर एका बाजुला ठेवले, पायातील चपला काढल्या, ओढणी कंबरेला बांधली आणि डोहात उडी घेऊन आपले जीवन संपवले. शुक्रवारी उशिरापर्यंत धामापूर येथे घरी न परतल्याने पोलीस, तिच्या घरच्या व गावातील लोकांनी शोधाशोध सुरु केली असता शनिवारी समता भायजे हिचा मृतदेह गडनदीच्या पात्रात आढळून आला. समताचं राहणीमान साधं होतं. ती मोबाईलही वापरत नव्हती. तिला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले, असे अनेक सवाल ती मागे सोडून गेली आहे. (वार्ताहर)