मातेच्या कष्टाला ‘सुपर वुमन्स’ची मदतीने दाद
By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:03:36+5:302015-06-25T01:08:43+5:30
जिद्दीला सलाम : संजनाला मिळालं मुलीला शिकवण्याचं बळ...

मातेच्या कष्टाला ‘सुपर वुमन्स’ची मदतीने दाद
रत्नागिरी : इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळत, कोणाची धुणीभांडी तर कोणाच्या पोळ्या लाटण्याचे काम करून मुलींच्या शिक्षणासाठी मातेची जिद्द ‘लोकमत’ने प्रसिध्द केली होती. त्याची दखल घेत येथील ‘सुपर वुमन्स’ या महिलांच्या एका हौशी ग्रुपने संजना गजानन पाष्टे यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
परिस्थितीमुळे स्वत:ला पदवीधर होता आले नाही, याची खंत उराशी बाळगत अविरत कष्ट करून परिस्थितीशी सतत झगडत, तिन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी संजना गजानन पाष्टे गेली चौदा वर्ष अर्थात एक तप त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाची भूमिका सांभाळत आहेत. पगार तुटपुंजा असला तरी सोसायटीकडून रहावयास मिळालेली छोटेखानी रूम, पाणी व विजेची मोफत व्यवस्था यामुळे त्या समाधानी आहे. कंत्राटी नोकरीमुळे नवऱ्याची मिळकत अपुरी, वाढत्या महागाईचा सामना करीत जगत असताना व मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आईची व्यथा दि. १ फेब्रुवारीच्या अंकात मांडली होती. त्याची दखल घेत ‘सुपर वुमन्स’ मंडळाने घेतली. नोव्हेंबरमध्ये या मंडळाची स्थापना झाली आहे. या मंडळाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पाष्टे यांच्या मुलींना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मदत करण्याचे ठरविले. या महिलांनी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी काही रक्कम पाष्टे यांच्याकडे सुपुर्द केली.
मंडळातील सखी नीता ठाणेदार दरवर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करतात. यावर्षी त्यांनी भगिनी मंडळातील सहकार्याबरोबर संजना यांची मोठी मुलगी ऋतुजा यावर्षी दहावीला असल्याने तिच्या क्लासची निम्मी फी ठाणेदार यांनी भरली असल्यामुळे पाष्टे यांना दिलासा मिळाला आहे. पाष्टे यांची दुसरी मुलगी सिध्दी सहावीत शिकत आहे. मंडळातील एक सखी अनिशा मुळ्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या शिकवणी घेत असल्यामुळे सिध्दीच्या शिकवणी क्लासची जबाबदारी घेतली आहे. सुपर वुमन्स मंडळामध्ये सोनाली सावंत, अनिशा मुळ्ये, ज्योती अवसरे-मुळ्ये, अनघा निकम-मगदूम, कोमल कुलकर्णी-कळंबटे, सुश्मिता साळवी, शुभदा चव्हाण, गायत्री विजापूरकर, अनुश्री भावे, गौरी जोशी, नीता ठाणेदार, श्वेता बाष्टे, मीनाक्षी सौंदळगेकर, स्नेहा नामजोशी-कर्वे, डॉ. मधुरा सावंत, आदिती देसाई, पद्मजा जोशी या महिलांचा समावेश आहे. दरमहा ठराविक रक्कम काढून समाजातील गरजूंना मदत करण्याचे या भगिनींनी ठरविले आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. अशावेळी केलेले दान सत्पात्री असावं, असे आवाहन या भगिनीनी केले आहे. (प्रतिनिधी)