अचानक संपाने प्रवासी बेहाल
By Admin | Updated: December 17, 2015 23:21 IST2015-12-17T23:21:41+5:302015-12-17T23:21:41+5:30
इंटक संघटना : रत्नागिरीत एस्. टी. वाहतूक दिवसभर ठप्प

अचानक संपाने प्रवासी बेहाल
रत्नागिरी : एस. टी. कर्मचाऱ्यांचा २०१२ ते १६ या वर्षांसाठीचा कामगार करार रद्द करून महामंडळातील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी रत्नागिरीतील एस. टी. कर्मचारी संपावर गेले. कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेल्या अनेक दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. मात्र, गुरुवारी अवचितपणे त्याचा भडका उडाला आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारला. एस. टी.च्या इंटक या संघटनेने हा संप पुकारला. मात्र, कर्मचाऱ्यांनी आज संपाचे हत्यार उपसताच त्याला इतर संघटनांनी साथ दिली व डेपोमध्ये गाड्या उभ्या करुन ठेवल्या. रत्नागिरी डेपोतील शेकडो कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. गुरुवारचा संप हा इंटकच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आला होता. रत्नागिरी एस. टी. डेपोमध्ये इंटकची संघटना फारशी मजबूत नसूनही हा संप रत्नागिरी डेपोमध्ये यशस्वी झाला.
जिल्हाभरातील इतर तालुक्यांतून एस. टी. महामंडळाच्या गाड्या रत्नागिरीमध्ये वेळेवर येत होत्या व त्या रत्नागिरी डेपोमधून सुटतही होत्या. रत्नागिरी आगारातून सकाळी ९.३० वाजल्यानंतर शहरी वाहतूक अथवा ग्रामीण वाहतुकीची एकही एस. टी. बस सुटली नाही.
एस. टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी, एस. टी.चे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बोलणी करुनही कामगार संघटनांचे कर्मचारी ऐकण्यास तयार नसल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर दिसले.
कोणत्याही प्रकारची आगाऊ माहिती न देता गुरुवारी एसटी कर्मचारी संपावर गेले. यामुळे अधिकारीवर्ग गोंधळला. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन अधिकारीवर्ग मध्यस्थी करीत असताना कोणालाही न जुमानता प्रवाशांना वेठीस धरल्याप्रकरणी एस. टी. महामंडळाकडून कर्मचारी संघटनांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)