गुहागरला माहितीचा असाही फटका

By Admin | Updated: July 24, 2014 22:44 IST2014-07-24T22:34:53+5:302014-07-24T22:44:58+5:30

भूमी अभिलेखची चूक : केवळ ३२० हेक्टर कांदळवन क्षेत्राची नोंद

Such a blow to the news of Guhaagar | गुहागरला माहितीचा असाही फटका

गुहागरला माहितीचा असाही फटका

संकेत गोयथळे- गुहागर
गुहागर तालुक्यात कांदळवनाचे सर्वाधिक १७०० हेक्टर क्षेत्र असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, भूमी अभिलेख खात्याच्या चुकीच्या नोंदीमुळे एवढे मोठे क्षेत्र नोंदले गेले असून, नव्याने झालेल्या सर्वेक्षणात हे क्षेत्र फक्त ३२० हेक्टरपर्यंत असल्याची माहिती पुढे येत आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सीज अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्याकडून सॅटेलाईटद्वारे घेतलेला नकाशा व एरिया स्टेटमेंट भूमी अभिलेख खात्याकडे देण्यात आले होते. याबाबतची कांदळवन क्षेत्राची माहिती सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेल्या मापांमध्ये देण्यात आली आहे. ही मापे प्रत्यक्ष हेक्टर व गुंठे स्वरुपात करताना भूमी अभिलेख खात्याकडून चूक झाली व प्रत्यक्ष ३२० हेक्टरपर्यंत असलेले क्षेत्र १७०० हेक्टरपर्यंत शासन दरबारी नोंदले गेले. यामध्ये घरटवाडी येथील कांदळवन क्षेत्राची सॅटेलाईट नोंदीद्वारे ६.५०.६५ अशी नोंद असताना हा आकडा एकत्रित ६५०.६५ हेक्टर असा चुकीच्या पद्धतीने टाईप होऊन आल्याने घरटवाडी येथे प्रत्यक्ष ६ हेक्टर क्षेत्र ६५० हेक्टर दाखवले गेले. तवसाळ येथेही प्रत्यक्ष क्षेत्र ६ हेक्टर १० गुंठे आहे. मात्र, टायपिंग मिस्टेकमुळे ६१० हेक्टर एवढे दाखवले गेले. अशाच प्रकारे अन्य काही गावांची लहान मोठ्या प्रमाणात चुकीची नोंद केल्यामुळे गुहागर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक १७०० हेक्टर कांदळवन क्षेत्र दाखवले गेले.
सर्वाेच्च न्यायालयाने संरक्षण दिल्याने कांदळवनाबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून गतिमान हालचाली होऊ लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी शासनामार्फत कांदळवनक्षेत्र आरक्षित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने पुढील कार्यवाही झाली नाही. नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून महसूल खाते, वन विभाग व भूमी अभिलेख यांना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी तातडीने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूलचे मंडल अधिकारी भूमी अभिलेख व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कांदळवन क्षेत्राचे संयुक्तपणे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. यावेळी या क्षेत्रामध्ये मोठी तफावत असल्याचे लक्षात आले. भूमी अभिलेखचे प्रमुख अधिकारी सावंत यांनी २५० हेक्टरचा प्रथम अहवाल तयार केला. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी महसूल खात्याकडे फार कमी क्षेत्राची प्रत्यक्ष कांदळवनाची नोंद असल्याने यामधील त्रुटी करण्याच्या सूचना दिल्या. सावंत हे प्रकृ ती अस्वास्थ्यामुळे महिनाभर सुटीवर गेल्याने चिपळूणचा भूमी अभिलेख कार्यालयाचा पदभार असलेल्या सुप्रिया शिंथरे यांनी टायपिंगच्या झालेल्या चुका शोधून काढल्या. जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर अधिसूचनेसाठी आवश्यक पुढील कार्यवाही सुरु केली जाणार आहे.
तालुक्यात सवार्धिक कांदळवन क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढे प्रधान कार्यालय होण्याबाबत कोणते प्रयत्न केले जातील याबाबत उत्सुकता आहे.

गुहागर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक कांदळवन क्षेत्र जिल्ह्यात२१०० हेक्टरपर्यंत कांदळवन क्षेत्र दाखवले आहे. चुकीच्या नोंदीमुळे गुहागर तालुक्यात झालेली १७०० हेक्टरची नोंद वगळल्यास इतर तालुक्यांचे ४०० हेक्टर क्षेत्र होते. नव्याने नोंद झालेल्या क्षेत्राचा विचार करता गुहागर तालुक्यात ३२० हेक्टर असल्याची माहिती पुढे येत आहे.
कांदळवन क्षेत्रामुळे त्सुनामीसारख्या संभाव्य धोक्यापासून लोकवस्तीचे संरक्षण होते. तसेच माशांचे किनारी भागात प्रजनन होऊन मासळी चांगल्या प्रभावात मिळते. हे फायदे लक्षात घेऊन कांदळवन क्षेत्र आरक्षित करण्याचा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मधुकर शेळके यांची वनक्षेत्रपाल, कांदळवन अशी स्वतंत्र नियुक्ती केली आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीचे गुहागर हे केंद्र आहे. सर्वाधिक क्षेत्र गुहागर तालुक्यात असल्याने येथे कांदळवन विभागाचे प्रधान कार्यालय होण्यासाठीचा प्रस्तावही गतवर्षी तयार करण्यात आला आहे.

Web Title: Such a blow to the news of Guhaagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.