विषय समित्यांमध्ये सेनेची राष्ट्रवादीवर मात
By Admin | Updated: October 2, 2014 00:18 IST2014-10-01T22:30:02+5:302014-10-02T00:18:45+5:30
जिल्हा परिषद : शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आली चव्हाट्यावर, मात्र युती कायम

विषय समित्यांमध्ये सेनेची राष्ट्रवादीवर मात
रत्नागिरी : आज झालेल्या जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युती कायम असून, राष्ट्रवादीवर मात करीत शिवसेनेने आज सर्व सभापतिपदे पदे जिंकली. त्याचवेळी नुकत्याच राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या शीतल जाधव यांना समाजकल्याण सभापतिपदी बसवून राष्ट्रवादीला धक्का दिला. तसेच आजच्या जिल्हा परिषदेतील राजकारणामुळे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाच२ जोरदार प्रयत्न करण्यात आले.
या चारही समित्यांच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना - भाजपा युती यांच्यामध्ये सरळ लढत झाली. यामध्ये समाजकल्याण सभापती पदासाठी युतीच्या शीतल जाधव आणि काँग्रेसच्या सुजाता तांबे, महिला व बालकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्रा ठाकूर आणि शिवसेनेच्या प्रज्ञा धनावडे, तर बांधकाम व आरोग्य आणि शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या नेहा माने, अजय बिरवटकर यांच्या विरोधात डॉ. अनिल शिगवण, ऐश्वर्या घोसाळकर यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी १८ मते आणि शिवसेनेच्या चारही उमेदवारांना ३३ मते पडल्याने युतीने १५ मतांनी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करुन जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमरोली (मंडणगड) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शीतल जाधव यांनी मंगळवारी अचानक जैतापूर येथे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याची कल्पना जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या इतर सदस्यांना नव्हती. मात्र, दापोलीचे आमदार दळवी यांनी शीतल जाधव यांचे नाव समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी जाहीर केल्याने सर्वच सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेने समाजकल्याण सभापती भगवान घाडगे यांना याचा धक्का बसला. त्याचवेळी संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या वेदा फडके याही शिक्षण समितीसाठी इच्छुक होत्या. त्यांना डावलण्यात आल्याने त्याही नाराज दिसत होत्या. दरम्यान काँग्रेस सदस्य सुजाता तांबे यांना पालकमंत्री सामंत यांनी सभापतिपदाचे गाजर दाखविले. मात्र, पालकमंत्र्यांना स्पष्ट शब्दात नकार देत त्यांनी यापूर्वी आपण अध्यक्षपदाची आॅफरही नाकारल्याचे सांगितले. (शहर वार्ताहर)
जाधवांच्या अपात्रतेबाबत मागणी
शीतल जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रतोद संजय कदम यांनी सांगितले. जाधव यांच्या जातीच्या दाखल्यावर शासनाचे सील नसल्याचा राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. मात्र, तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला.
राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या शीतल जाधव यांचे नाव समाजकल्याण सभापतिपदासाठी जाहीर करताच भगवान घाडगे अध्यक्षांच्या चेंबरमधून निघून गेले. त्यानंतर माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी त्यांची समजूत घातली.