उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्याच जागेत
By Admin | Updated: July 9, 2015 00:10 IST2015-07-09T00:10:02+5:302015-07-09T00:10:02+5:30
संगमेश्वर तालुका : जागा मिळवण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड

उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्याच जागेत
सचिन मोहिते -देवरुख -संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्राचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, तालुक्यातील अनेक उपकेंद्र गेली कित्येक वर्षे भाड्याच्या जागेतून आरोग्याचा गाडा हाकत आहेत. तालुक्यात ५५ उपकेंद्रांपैकी तब्बल २४ उपकेंद्र तूटपंज्या भाडेतत्त्वावरील जागेत आरोग्याचा गाडा हाकत असल्याची केविलवाणी स्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत येणाऱ्या उपकेंद्रांची संख्या एकूण ५५ इतकी आहे. त्या ५५ उपकेंद्रांतील २४ उपकेंद्र भाड्याच्या इमारतीतून चालवण्यात येत आहेत.
उपकेंद्रासाठी तेथील ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, आजपर्यंत जागेअभावी ही २४ उपकेंद्र भाड्याच्या खोलीतूनच चालवली जात आहेत. मात्र, तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे. आरोग्य प्रशासन याबाबत कोणताच ठोस निर्णय घेऊ शकत नाही. जागा उपलब्ध होत नसल्यास मंजूर असलेली उपकेंद्र लगतच्या गावात स्थलांतरित करावीत, असा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य कार्यालयाला पत्राद्वारे दिला आहे.
या आदेशामुळे एकतर तेथील भाड्याच्या जागेत असणारी उपकेंद्र इमारतीमध्ये येण्यास मदत होणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती आजपर्यंत या विषयाकडे गांभीर्याने पाहात नाहीत, अशा ग्रामपंचायतींनाही जाग येऊन आपल्या गावातील उपकेंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होईल, या भीतीपोटी तरी तेथे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, या बाबीची गांभीर्याने अंमलबजावणी झाल्यास उपकेंद्रांच्या भाड्याच्या जागेतील वनवास लवकरच संपुष्टात येणार आहे.
भाड्याच्या जागेमध्ये आपला आरोग्याचा गाडा हाकणाऱ्या उपकेंद्रांमध्ये कोळंबे पांगरी, वांद्री, नायरी, कारभाटले, कसबा, मांजरे, कोंडअसुर्डे, नांदळज, तेऱ्ये, भोवडे, ओझरे बु., बोरसूत, ओझरे खुर्द, देवळे, तिवरे, बुरंबाड, धामापूर, करजुवे, आंबव, कडवई, राजिवली, आंगवली आणि मारळ यांचा समावेश आहे. या चोवीस उपकेंद्रांपैकी १८ उपकेंद्रांच्या इमारतींना जागाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी स्थलांतर करावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.