औषधनिर्माण शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 20:02 IST2017-06-12T20:02:47+5:302017-06-12T20:02:47+5:30
फार्मसीच्या प्रवेशाला १७ जूनची ह्यडेडलाईनह्ण: आॅनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

औषधनिर्माण शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा
ब्रम्हानंद जाधव/ बुलडाणा
राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून असून औषधनिर्माण शास्त्राच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे.
उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बारावीच्या निकालाच्या गुणपत्रिका (हार्ड कॉपी) मिळाल्यानंतरच सुरू होतात. बारावीचा निकाल ३० मे रोजी विद्यार्थ्यांच्या हातात पडताच विज्ञान, कला आणि वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशाचे वेध लागले. निकालानंतर दुसऱ्याच आठवड्यापासून विविध विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयांनीही तयारी पूर्ण केली असून, अनेक महाविद्यालये यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. बारावी विज्ञानशाखेनंतर औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमामध्येही दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये डी.फार्मसी हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येऊ शकते. त्यानंतर बी.फार्मसी ही पदवी घेता येते. राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी ६ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. औषधनिर्माण शास्त्राच्या या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून देण्यात आली असून, यावर्षी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या महाविद्यालयांकडून महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर सुद्धा अर्ज अपलोड केले जात आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांप्रमाणे गुणवत्ता यादी तयार करून, त्यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातही पोहचले फार्मसीचे जाळे
औषधनिर्माण शास्त्र पदवी (बी फार्म) आणि औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी फार्म) महाविद्यालयाचे ग्रामीण भागातही जाळे पसरले आहे. महाराष्ट्र शासनाने बी. फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालये सुरु करण्यासाठी अनेक ठिकाणी मान्यता दिली आहे. तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि फार्मसी कौन्सिल आॅफ इंडिया या शिखर संस्थांची देखील राज्यातील काही औषध निर्माण शास्त्राच्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. मोठ्या संस्थांची मान्यता मिळत असल्याने राज्यातील बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालयांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.