विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकांबरोबर पूरक वाचन गरजेच
By Admin | Updated: December 30, 2015 00:44 IST2015-12-29T22:26:16+5:302015-12-30T00:44:32+5:30
किरण लोहार : जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन; पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात गं्रथ दिंडी मिरवणूके

विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकांबरोबर पूरक वाचन गरजेच
रत्नागिरी : विविध प्रकारची माहिती संचित स्वरूपात पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिकून इंग्रजी भाषेकडे वळावे. शालेय पुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करा. केवळ वाचन न करता पुस्तके समजून घ्या. ज्ञानस्वरूपात उपलब्ध असलेल्या लेखक, कवींच्या अन्य साहित्याचेही वाचन करा, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग व पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी डी. एस. पवार, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे, उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, कवी सुरेश मोहिते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सकाळी पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात ग्रंथ दिंडी मिरवणूक आल्यानंतर पूजन व स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या सभागृहात ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर यांनीही ग्रंथ महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. कवी सुरेश मोहिते यांनी काही कविता सादर केल्या.
यावेळी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, उतारा वाचन, नाट्यवाचन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सूत्रसंचालन योगिता भागवत यांनी केले. मुख्याध्यापक विजय वाघमारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)