विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका
By Admin | Updated: November 11, 2015 00:13 IST2015-11-10T22:27:11+5:302015-11-11T00:13:40+5:30
शिक्षणाचे धडे भिजत : रत्नागिरीतील राजिवडा मत्स्योद्योग शाळेची अवस्था

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका
रहिम दलाल -- रत्नागिरी -शहरातील राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोेका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यामध्ये शाळेत गळतीचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात भिजत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे ही शाळा जिल्हा परिषद की, मत्स्य विभाग यापैकी कोण चालवित आहे, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
जिल्ह्यात राजिवडा आणि साखरीनाटे (ता. राजापूर) या दोन शाळा शासनाच्या मत्स्योद्योग विभागाच्या आहेत. या दोन्ही शाळांमध्ये मच्छिमारांची मुले शिकत असून, त्यांच्यासाठी मासेमारीशी संबंधित मत्स्योद्योग आणि सुतारकाम हे इतर शाळांपेक्षा वेगळे विषय शिकविले जातात. दोन वर्षांपूर्वी या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या. त्यानंतर या शाळेतील शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यापासून सुरु झाली. त्यामुळे या शाळांतील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शाळेतील शिक्षक वर्ग अडचणीत आहेत. राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे छप्पर कौलारु असल्याने कौले फुटली आहेत. लाकडी वासेही जुने झाल्याने ते मोडकळीस आले आहेत. या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, शाळेची जागा, इमारत जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही शाळा दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून झटकण्यात येते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या शाळेच्या छपरातून गळती लागते. अनेकदा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, वह्या भिजल्याने शैक्षणिक नुकसान होते. तसेच भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या दुरुस्तीबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून हात झटकले जातात. कारण या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेला दिलेले असले तरी या शाळेची इमारत व जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्नही अधांतरीच आहे. ही शाळा शासनाचे मत्स्योद्योग खाते की, जिल्हा परिषदेकडे आहे, हा प्रश्न येथील रहिवाशांना सतावत आहे. एकूणच मत्स्योद्योग खाते आणि जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका शिक्षक व विद्यार्थ्यांना बसत आहे.
टोलवाटोलवीची उत्तरे : इमारतीच्या भिंतीना तडे
या शाळेच्या इमारतीच्या भिंतीना तडे गेले आहेत. तसेच छप्पाराची कौलेही फुटली असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या गलतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या शाळेच्या दुरुस्तीबाबत मत्स्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांचेकडे शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता तिन्ही विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात येते.
दुरूस्तीची अनास्था
राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. असे असूनही या इमारतीच्या दुरूस्तीबाबत अनास्था असून, टोलवाटोलवीची उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.