शिक्षक आंतरजिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: December 8, 2015 00:35 IST2015-12-07T22:32:15+5:302015-12-08T00:35:00+5:30
जिल्हा परिषद : लोकप्रतिनिधी ढीम्म, राजकीय दबाव टाकून प्रयत्न, परजिल्ह्यातील भरतीचे परिणाम

शिक्षक आंतरजिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे हाल
रहिम दलाल--- रत्नागिरी --जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असतानाही विद्यार्थ्यांचे नुकसान करुन आंतरजिल्हा बदलीने २६ शिक्षकांना सोडण्यात आले. त्याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्यात येत होता. जिल्हा परिषदेकडून होणारी शिक्षणसेवक भरती नेहमीच वादाची ठरली आहे. शिक्षणसेवक भरतीच्या वेळी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी सुरुवातीला शिवसेनेने आंदोलने केली. त्यानंतर स्थानिकांसाठी मनसेने आंदोलन उभारले होते. शिवसेना व मनसेने केलेल्या आंदोलनांमुळे परजिल्ह्यातील अनेक उमेदवार परीक्षेला आलेले नव्हते. डी. एड.धारक स्थानिक उमेदवारांनीही जेलभरो आंदोलन केले होते. त्यानंतरही शिक्षणसेवक भरती करण्यात आली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये सव्वा लाख विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ९००० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या सुमारे १३०० प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १ ते १० पटसंख्या असलेल्या शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक शिक्षणसेवक भरतीमध्ये परजिल्ह्यातील ९५ टक्के उमेदवारांचा भरणा करण्यात येतो. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याची ओरड डी. एड.धारकांकडून करण्यात येते. अजूनही डी. एड.धारक स्थानिक बेरोजगारांचा शिक्षणसेवक नियुक्तीसाठी लढा सुरूच आहे. या आंतरजिल्हा बदल्यांसाठी नातेवाईकांचे खोटे दाखले जोडणाऱ्या शिक्षकांचा प्रताप सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला होता. मात्र, या शिक्षकांनी आपण हे दाखले जोडले नसल्याचे सांगून खोटे बोलण्याचा कहरच केला आहे.मागील वर्षात शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात निघून गेले होते. सांगली, अहमदनगर, नाशिक, बीड या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये त्यांनी बदल्या करून घेतल्या. याप्रमाणे दरवर्षी शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने निघून जात आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांची सुमारे १०० पदे रिक्त असतानाही पुन्हा २६ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याची जाणीव येथील लोकप्रतिनिधींना होणे आवश्यक आहे. मात्र, या आंतरजिल्हा बदलीसाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्यानेच अनेक दिवस रखडलेल्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी प्रयत्न करत असलेल्या शिक्षकांना सोडण्यात आले. त्यामुळे डी. एड. बेरोजगारांमध्ये असंतोष कायमचा खदखदत राहणार आहे.
शिक्षणसेवक नियुक्ती : परजिल्ह्यातील उमेदवारांना मिळते संधी
शिक्षणसेवक नियुक्त झाल्यावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर दरवर्षी शेकडो शिक्षक जिल्हा बदली करुन निघून जातात. त्यामुळे येथील शिक्षकांच्या जागा रिक्त होऊन शिक्षणसेवक भरतीला पुन्हा जोर येऊन परजिल्ह्यातील उमेदवारांना त्यामध्ये प्राधान्याने संधी मिळते.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये शासनाकडून आयुक्त कार्यालयाकडून आंतरजिल्हा बदलीचे शिक्षकांचे प्रस्ताव माघारी पाठवण्यात आले होते. हे प्रस्ताव आयुक्त मंजुरीसाठी कार्यालयाकडे पाठवण्याकरिता लाखो रुपयांची सौदेबाजी झाल्याची चर्चा होती.
गुरुजनांनी फसवले
आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले होते. आंतरजिल्हा बदल्यांसाठी काही गुरुजनांकडून फसवणूक झाल्याने हा विषय सध्या गाजत आहे.