आविष्कार’च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या कंदील अन् पणत्या

By Admin | Updated: October 20, 2016 01:05 IST2016-10-20T01:05:53+5:302016-10-20T01:05:53+5:30

वस्तूंच्या विक्रीतून या विद्यार्थांना स्वयंरोजगार मिळणार

The students of the discovery made the lanterns and dancers | आविष्कार’च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या कंदील अन् पणत्या

आविष्कार’च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या कंदील अन् पणत्या

रत्नागिरी : दिवाळी सण जवळ आल्याने गतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत येथील ‘आविष्कार’ संस्थेच्या कार्यशाळतील विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे आकाशकंदील, आकर्षक पणत्या, शुभेच्छा पत्र आणि आयुर्वेदिक उटण्यांची निर्मिती केली आहे. दि. २४ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या वस्तूंच्या विक्रीतून या विद्यार्थांना स्वयंरोजगार मिळणार आहे.
आविष्कार संस्थेच्या कै. शामराव भिडे कार्यशाळेत १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर केले जाते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार हस्तकला, स्टेशनरी मेकिंग, शिवणकाम, प्राथमिक सुतारकाम, ज्वेलरी, मेणबत्ती बनविणे, गृहशास्त्र आदी व्यावसायिक प्रशिक्षण विविध विभागांमार्फत देण्यात येते. या वस्तूंच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येते. या उपक्रमांना समाजातूनही मोठा हातभार लागतो.
वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती शामराव भिडे कार्यशाळेचे विद्यार्थी दरवर्षी करतात. या कार्यशाळेचा सध्या ७९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. यावर्षी या विद्यार्थ्यांनी लहान, मोठे आकाशकंदील, रंगीेबेरंगी आकर्षक पणत्या, आयुर्वेदिक उटणे, शुभेच्छा पत्रे आदींची निर्मिती केली आहे. गेल्या अडीच महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध वस्तूंची निर्मिती केली आहे.
या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री दि. २४ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत मारूती मंदिर येथील आनंद स्वीट मार्टसमोर करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा नीला पालकर, सचिव उमा बिडीकर, उत्पादन केंद्र समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि शामराव भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: The students of the discovery made the lanterns and dancers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.