चिपळूण : शहरातील मापारी मोहल्ला भागात १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. शाहीन उंडरे असे या मृत मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. मापारी मोहल्ला येथे शाहीन फाईक उंडरे ही नववीत शिकणारी विद्यार्थिनी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. घरालगत असलेल्या विजेच्या खांबावरील वायर तुटून पडली होती. तिला या मुलीचा स्पर्श झाला व ती तडफडू लागली. तिचे चुलते नुरुद्दिन महामुद उंडरे व चुलती मैमुना उंडरे तिला सोडविण्यासाठी तत्काळ धावले. मात्र, त्यांच्या प्रयत्नाआधीच शाहीनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. तिचे चुलते व चुलती गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मैमुना यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यावेळी हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी जमली होती. या दुर्घटनेची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Updated: March 27, 2015 00:38 IST