आदवडेवाडीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
By Admin | Updated: August 22, 2014 22:47 IST2014-08-22T22:42:10+5:302014-08-22T22:47:22+5:30
भोम-आदवडेवाडी आजपर्यंत एस. टी. सेवेपासून वंचित होती

आदवडेवाडीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
चिपळूण : तालुक्यातील भोम - आदवडेवाडीतून लालबाग येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची जवळपास दोन किलोमीटरची पायपीट थांबली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे गावात प्रथमच एस. टी. सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावात गेलेली पहिलीच एस. टी. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसह भरून आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.
भोम-आदवडेवाडी आजपर्यंत एस. टी. सेवेपासून वंचित होती. वाडीकडे जाणारा चांगला रस्ता आहे. अनेक लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही एस. टी. सुरू होत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत दोन किलोमीटरची पायपीट नेहमी करावी लागत होती़ विक्रांत जाधव यांनी काही दिवसांपूर्वी खाडीपट्ट्यातील गावांचा दौरा केला. आदवडेवाडीतील दिनेश आदवडे, शांताराम आदवडे व अन्य ग्रामस्थांनी त्यांच्याकडे एस. टी. सेवेबाबतची कैफियत त्यांच्याकडे मांडली होती़ यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून व पाठपुरावा करून त्यांनी एस. टी. सुरू केली. ही गाडी आदवडेवाडीतील विद्यार्थ्यांना घेऊन लालबागपर्यंत जाईल आणि तेथून चिपळूण अशी दररोज फेरी मारणार आहे़ यावेळी जाधव यांनी वाडीतील अन्य प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी नंदू चव्हाण, उपसरपंच अरविंद घोणे, दिनेश आदवडे, शांताराम आदवडे, धोंडू आदवडे, सुनील आदवडे, उदय आदवडे, बामणे, गिरीश चव्हाण, सुजित शिंदे, ओंकार भाटकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)