विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद
By Admin | Updated: January 7, 2016 00:40 IST2016-01-07T00:01:54+5:302016-01-07T00:40:25+5:30
शेखर निकम : विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद
चिपळूण : उद्याचा खंबीर विद्याविभूषित नागरिक म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते, त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे हा शासनाचा नाकर्तेपणा आहे. आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आघाडी शासन यशस्वी झाले. मात्र, युती सरकार सत्तेत आल्यापासून विद्यार्थी देशोधडीला लागला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी केली.
यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील उपस्थित होते. सावर्डे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर सावर्डे विभागातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोर्चात एकत्र आले होते. यावेळी निकम म्हणाले की, जगामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचे वाढणारे महत्त्व लक्षात घेऊन देशातील अन्य राज्यांमध्ये व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणाला शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, राज्य शासनाला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करुन नेमके काय साधायचे आहे? हे न उलगडलेले कोडे आहे. तातडीने विद्यार्थी शिष्यवृत्ती नव्याने सुरु न केल्यास आगामी काळात राज्य शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या विरोधात शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे विद्यार्थी एकवटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरु केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे, चिपळूण परिसरातील ५०० विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी अशोक विचारे, सुनितकुमार पाटील, तानाजी कांबळे, उमेश लकेश्री, अमित सुर्वे, शकील मोडक, एकनाथ सावर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शासनाचा नाकर्तेपणा : विद्यार्थी एकवटले
युती शासनाविरोधात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने टिकास्त्र सोडले आहे. शासनाचा नाकर्तेपणा समोर आणण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याचा मुद्दा यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.