युतीने ताकद राखली; आता पुढे?

By Admin | Updated: May 18, 2014 00:29 IST2014-05-18T00:29:04+5:302014-05-18T00:29:57+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेना-भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत आपली

Strength strengthened; Now forward? | युतीने ताकद राखली; आता पुढे?

युतीने ताकद राखली; आता पुढे?

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेना-भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद कायम राखली. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मिळालेल्या ३१ हजार ५६५ आघाडीवरुन रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आजही शिवसेना-भाजपची ताकद अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हीच ताकद यापुढेही कायम राहणार का असाच प्रश्न आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसची ताकद क्षीण असली तरी राष्ट्रवादीची ताकद खूप चांगली आहे. उदय सामंत यांनी आपल्या आमदारकीच्या दोन टर्ममध्ये आपले बस्तान चांगले बसवले आहे. अर्थात गेल्या पाच वर्षात त्यात बरेच बदल झाले आहेत. पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर २0१२मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यात रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादीचे यश काहीसे कमी झाले. भास्कर जाधव-उदय सामंत यांच्या वादामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची पडझड काही प्रमाणात थांबली आहे. राष्ट्रवादीच्या या ताकदीचा फायदा लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना होईल, असे अपेक्षित धरले जात होते. चिपळूण आणि राजापुरात शिवसेनेला मताधिक्य मिळाले तरी रत्नागिरीत ५0-५0 टक्के मते दोन्ही पक्षांना मिळतील, असे अपेक्षित धरले जात होते. पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी प्रचारात मोठा सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे कितीसे पदाधिकारी ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते, हा वादाचा मुद्दा असला तरी उदय सामंत यांनी मात्र प्रचारात खूप लक्ष दिले. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात नीलेश राणे यांना मोठी आघाडी मिळाली नाही तरी ते मागेही पडणार नाहीत, असे गृहीत धरले जात होते. चिपळूण विधानसभा मतदार संघ क्षेत्रात भास्कर जाधव यांनी प्रचारात सहभाग घेतला नसल्याने तेथे राऊत यांना आघाडी मिळेल, असाही अंदाज होता. कागदावरची आकडेमोड आणि राजकीय धुरिणांचे अंदाज चुकवत प्रत्यक्ष चित्र मात्र खूपच वेगळे दिसले. चिपळूणपेक्षा रत्नागिरी विधानसभा मतदार संघात राऊत यांना जास्त मताधिक्य मिळाले. खरे तर या निवडणुकीत सर्वात मोठा विजय आहे तो राणेविरोधी वातावरणाचा आणि मोदीलाटेचा. राष्ट्रवादीने काम केले किंवा नाही केले या मुद्द्याने या निवडणुकीत फारसा फरक पडला नसता. शहरी भागात सोशल मीडियामुळे मोदी नावाच्या वादळाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातही विशेषत्वाने तरूण वर्गात मोदी नावाची मोठी ‘क्रेझ’ आहे. नवमतदारांचा ओघ मोदींकडे अधिक आहे. त्यामुळे राऊत यांची मते वाढली, हे स्पष्ट आहे. नीलेश राणे यांनी खासदारकीच्या काळात रत्नागिरी तालुक्यातही अनेक ठिकाणी आपला निधी दिला. मात्र त्या निधीचे अपेक्षित क्रेडीट मिळवण्यात त्यांची पुढची फळी कमी पडली. मुळात काँग्रेसची ताकद कमी हाही त्यांच्यासाठी मोठा तोटा आहे. त्यामुळे राणे यांनी विकास कामे करूनही त्याचे ‘मार्केटींग’ झाले नाही आणि राणे ‘एस्टाब्लिश’ झाले नाहीत. हे मार्केटींगचे तंत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे चांगले आहे. या निवडणुकीत शिवसेनेइतकीच किंबहुना काकणभर अधिक मेहेनत घेतली ती भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी. या निवडणसुकीप्रमाणेच पुढच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपचे बाळ माने, सर्व पदाधिकारी सक्षमपणे कार्यरत होते, याची नोंद सार्‍यांनाच घ्यावी लागणार आहे. या निकालावर मोदीलाटेचा आणि राणेविरोधी वातावरणाचा प्रभाव आहे, असे म्हणून राष्ट्रवादीला बदललेल्या वातावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बर्‍याच काळानंतर मिळालेल्या यशामुळे शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच तालुक्याच्या तळागाळात युतीची ताकद चांगली आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला द्यावी लागणारी लढत अधिक गंभीर झाली आहे. विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार बाळ माने यांनी राऊत यांच्या प्रचारादरम्यान राणे यांच्यापेक्षा उदय सामंत यांच्यावरच अधिक टीका करून विधानसभेची तयारी केली आहे. मरगळ आलेल्या युतीला या विजयामुळे चैतन्य मिळाले आहे. त्यामुळे नीलेश राणे यांच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीला मोठा बोध घ्यावा लागणार आहे, एवढं मात्र स्पष्ट झालंय. (प्रतिनिधी)

Web Title: Strength strengthened; Now forward?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.