पथदीप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:33+5:302021-09-11T04:32:33+5:30

खेड : नगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी चौक ते अण्णाचा पऱ्या आणि जनावरांचा दवाखाना रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद ...

Streetlights off | पथदीप बंद

पथदीप बंद

खेड : नगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी चौक ते अण्णाचा पऱ्या आणि जनावरांचा दवाखाना रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून, रात्रीच्या वेळी चाचपडतच प्रवास करावा लागतो. ऐन गणेशोत्सवातही हे पथदीप बंद असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव २६ सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. १० वी परीक्षेत ८५ टक्के आणि १२ वीत ८० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी यांच्यासह पदविका, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदी प्रदीप शिंदे

चिपळूण : कोळकेवाडी गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून प्रदीप शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच पल्लवी शिंदे, सर्व सदस्य, माजी सरपंच नीलेश कदम तसेच अन्य ग्रामस्थही उपस्थित होते.

गणपती सजावट स्पर्धा

सावर्डे : चिपळूण येथील रंजिता फाउंडेशनतर्फे गणेशोत्सवानिमित्त शहरवासीयांसाठी घरगुती गौराई-गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम क्रमांकास चांदीची गणेशमूर्ती, द्वितीय क्रमांकास चांदीचे निरंजन तर तृतीय क्रमांकास चांदीची लक्ष्मीची मूर्ती देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

जादा भाडे घेतल्यास दंड

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे घेणाऱ्या खासगी प्रवासी बसवाहतूकदारांवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी वाहनांनी जादा दराने भाडे आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना देण्यात आले आहेत.

वारकऱ्यांचे निवेदन

लांजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली शासकीय मदत वेळेवर मिळावी, यासाठी वारकऱ्यांकडून येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. मदतीसाठी तालुक्यातील ९५ प्रस्ताव मंत्रालयात दाखल झाले आहेत. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, गोविंद चव्हाण, रमेश घुमे, विजय वाडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Streetlights off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.