रत्नागिरी किनाऱ्याला वादळाचा तडाखा

By Admin | Updated: June 13, 2014 01:34 IST2014-06-13T01:29:22+5:302014-06-13T01:34:03+5:30

बांधलेल्या मच्छिमारी नौका भरकटल्या : उधाणाचे पाणी नागरी वस्तीत शिरले

Storm strike on the coast of Ratnagiri | रत्नागिरी किनाऱ्याला वादळाचा तडाखा

रत्नागिरी किनाऱ्याला वादळाचा तडाखा

रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्याने काल, बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. पहाटे रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात बांधून ठेवलेल्या काही मच्छिमारी नौका समुद्र खवळल्याने भरकटल्या. आज, गुरुवारी दुपारी व सायंकाळी सागराला आलेल्या उधाणाच्या भरतीचे पाणी किनारपट्टीवरील अनेक भागात शिरल्याने रहिवासी सागरी दहशतीखाली आहेत.
जिल्ह्यातील जैतापूर, पूर्णगड, रत्नागिरी, जयगड, गुहागर, हर्णे दापोलीसह संपूर्ण सागरी किनारपट्टीवर असलेल्या गावांच्या किनारी भागातील काही ठिकाणी आज दुपारी १२ वाजता व सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उधाणाच्या भरतीचे पाणी घुसले. रत्नागिरीतील मांडवी बंदर जेटीजवळ, भाट्ये किनारा, राजिवडा भागात दुपारी व सायंकाळी उधाणाच्या भरतीचे पाणी अनेकांंच्या कुंपणात शिरले. सागरी लाटांपासून संरक्षणासाठी यापैकी काही ठिकाणी दगडी बंधारेही उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यावरून पाणी नागरी वस्तीत शिरले. मात्र, पाणी कोणाच्या घरात शिरल्याचे वृत्त नाही. (प्रतिनिधी)
सागरी ‘बोयी’ भरकटले
मच्छिमारी नौका व अन्य नौकांना सागरी मार्गाबाबत मार्गदर्शन व्हावे म्हणून सागरात किनाऱ्याजवळ काही महत्त्वाच्या ठिकाणी सागरी ‘बोयी’ पाण्यात नांगरली जातात. रत्नागिरी ते मिऱ्या या समुद्री भागात अशी तीन बोयी असून रत्नागिरी सागरातील दोन बोयी समुद्री वादळाच्या तडाख्याने भरकटली. लोखंडी साखळी सागरतळाशी असलेल्या सिमेंट ब्लॉकपासून सुटून एक बोये भरकटत मिऱ्याच्या समुद्र किनारी लागले. या बोयावर असलेला सुमारे लाख रुपये किंंमतीचा सोलर लॅम्प व यंत्रणा सागरातच गहाळ झाली आहे.
नांगरलेल्या नौकाही भरकटल्या
वादळाच्या शक्यतेने मिरकरवाडा मच्छिमारी बंदरात नांगरून ठेवलेल्या नौका पहाटे आलेल्या जोरदार पावसाने व वादळी वाऱ्याने हेलकावे खाऊ लागल्या. जेटीच्या लोखंडी हूकला दोरखंडाने बांधून ठेवलेल्या सुमारे आठ मच्छिमारी नौका खवळलेल्या समुद्री लाटांच्या हेलकाव्यांनी काही काळ भरकटल्या. नंतर मच्छिमारांनी या नौका पुन्हा दोरखंडाने बांधल्या.
समुद्राने धोक्याची पातळी ओलांडली
हर्णेतील स्थिती : समुद्रकिनारपट्टीच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
दापोली : कोकणात काही तासांवर मान्सून येऊन ठेपल्याने वाऱ्याचा ताशी वेग वाढला आहे. या नैसर्गिक बदलांमुळे समुद्र खवळला आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्यात वाढ झाली असून हर्णे समुद्रकिनाऱ्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच आज गुरूवारी दुपारी हर्णे येथे काही दुकानात समुद्राच्या भरतीचे पाणी घुसल्याने खळबळ उडाली. तहसीलदार कल्पना गोडे यांनी किनारपट्टीच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
समुद्रात ताशी ३० ते ३५ कि.मी. वेगाने वारे वाहू लागल्याने समुद्र खवळला आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण झाल्याने कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये किंवा मच्छीमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करु नये, पारंपारिक पद्धतीने जाळे टाकून किंवा होडीने मासेमारी करु नये, असा इशारा गोडे यांनी दिला आहे. हर्णे, पाळंदे, सालदुरे, मुरुड, कर्दे, लाडघर, तामसतीर्थ, बुरोंडी, कोळथरे, दाभोळ, आंजर्ले, आडे, पाउले, उटंबर, केळशी आदी गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील या गावांनी सावध रहावे, समुद्राच्या पातळीत झपाट्याने बदल होत असल्याने समुद्रकिनाऱ्यावर कोणीही फिरायला जाऊ नये. महसूल व सरकारी कर्मचाऱ्याने ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीबाबत कल्पना द्यावी. कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना तहसीलदार गोडे यांनी दिल्या आहेत.
हर्णे येथे समुद्राने धोक्याची पातळी ओलांडली असून, समुद्राचे पाणी मानवी वस्तीत घुसल्याने काही काळ हर्णे बाजारपेठेतील परिस्थिती चिंताजनक बनली होती. हर्णे बंदराशेजारी असणाऱ्या दुकानदार, छोटे व्यावसायिक, ग्रामस्थ, रहिवासी यांनी तत्पर रहावे. रात्रीच्यावेळी समुद्रातील नैसर्गिक बदलाची कल्पना सरकारी यंत्रणा देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. नैसर्गिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज व सतर्क रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Storm strike on the coast of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.