कोयना धरणात ५२ दिवस पुरेल एवढा साठा
By Admin | Updated: April 10, 2015 23:51 IST2015-04-10T21:45:19+5:302015-04-10T23:51:49+5:30
नागरिकांसाठी खूशखबर : भरनियमन टळणार

कोयना धरणात ५२ दिवस पुरेल एवढा साठा
पाटण : उन्हाळ्याची तीव्रता अधिक दाहक होत असताना एप्रिल महिन्याच्या मध्यास कोयना धरणात ६२.८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. १०५.२५ टीएमसी पाणी क्षमतेच्या कोयना धरणातून १ जूनपासून आत्तापर्यंत वीजनिर्मितीसाठी ५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. परंतु तरीसुद्धा आगामी ५२ दिवसांसाठी धरणातील ६२.८५ टीएमसी पाणीसाठा उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर निश्चित मात करणार असून, विजेच्या भारनियमनाचे चटके यंदा जाणवणार नाहीत.
राज्यात जलविद्युत प्रकल्प हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. तर औष्णिक वीजप्रकल्प त्या मानाने जास्त आहेत. या सर्वांमध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे कोयना धरणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. प्रतिदिन १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता कोयनेत क्षमता आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून आजपर्यंत गेल्या दहा महिन्यांमध्ये पूर काळातील पाणी वगळता २५.७५ टीएमसी पाणी सांगलीकडे वीजनिर्मिती करून सोडण्यात आले आहे. वार्षिक करारानुसार विचार केल्यास यावर्षी वीजनिर्मितीसाठीच्या ६५.५० टीएमसी कोट्यातील पाण्यापैकी ५० टीएमसी पाणी वापरण्यात आले तर ३० टीएमसी या सिंचनासाठीच्या कोट्यापैकी
२५.७५ टीएमसी पाणी सांगलीकडे सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
अद्यापही धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे चिंतेचे कारण दूर झाले आहे. यापुढे कोयनेच्या १७. ३० टीएमसी पाणी साठ्यावर वीजनिर्मिती करता येणार आहे. मात्र कराराचा भंग करून १ जूनपर्यंत वीजनिर्मितीसाठी पाणी वापर शक्यता आहे.