प्रचारतोफा थंडावल्या
By Admin | Updated: January 16, 2015 23:43 IST2015-01-16T23:26:04+5:302015-01-16T23:43:16+5:30
लांजा नगरपंचायत : ‘चौरंगी लढती’, बंडोबांनी आणली रंगत

प्रचारतोफा थंडावल्या
अनिल कासारे -लांजा नगरपंचायतीत पहिल्यांदाच होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज, शुक्रवारी थंड झाल्या. गेले महिनाभर सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांनी उडालेला धुरळा आज खाली बसला. आता राहिलेल्या २४ तासात गुप्त प्रचारास वेग येणार आहे. दरम्यान, आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने लांजा शहरातील मुंबई - गोवा महामार्गावर प्रचार रॅली काढून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.
येथे राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येथे सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून, बंडोबांनी प्रत्येक प्रभागात आव्हान निर्माण केले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाल्याने, शिवसेनेने, अनेक उमेदवारांना तिकिट न दिल्याने नाराजी व्यक्त करत सर्वाधिक मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लागण शिवसेनेमध्ये झाली आहे.
शिवसेनेच्या अधिकृत असणाऱ्या उमेदवारांना ही बंडखोरी डोकेदुखी ठरणार आहे. नगरपंचायतीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने प्रचारासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, मालवणचे आमदार वैभव नाईक, लांजा - राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आदींना आज प्रचार रॅलीत उतरवून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेने प्रचार रॅली काढून, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आदी मोठ्या पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन, गाठीभेटी घेऊन आपल्या प्रचारावर भर दिला आहे. शिवसेनेने या निवडणुकीत दिग्गजांना उतरवून, निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याचा किती परिणाम मतदारांवर होतो, हे मतमोजणीच्या दिवशी समजणार आहे. (प्रतिनिधी)
एकूण १२ हजार ४०६ मतदार...
नगरपंचायतीच्या एकूण १७ प्रभागात १२ हजार ४०६ मतदार असून, त्यामध्ये पुरुष ६ हजार २६२ व महिला ६ हजार १४४ आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. प्रभाग १ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ३५३ मतदार आहेत. प्रभाग २ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ६८८ मतदार आहेत. प्रभाग ३ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ५२२ मतदार आहेत. प्रभाग ४ मध्ये ६ उमेदवार रिंगणात असून, १०४७ मतदार आहेत. प्रभाग ५ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून, ९२८ मतदार आहेत. प्रभाग ६ मध्ये ३ उमेदवार असून, ९१८ मतदार आहेत, प्रभाग ७ मध्ये ३ उमेदवार ७०२ मतदार आहेत. प्रभाग ८ मध्ये ४ उमेदवार ८६८ मतदार आहेत. प्रभाग ९ मध्ये ६ उमेदवार ९५८ मतदार आहेत. प्रभाग १० मध्ये ४ उमेदवार ७६२ मतदार आहेत. प्रभाग ११ मध्ये ४ उमेदवार ५०७ मतदार आहेत. प्रभाग १२ मध्ये ४ उमेदवार ७७१ मतदार आहेत. प्रभाग १३ मध्ये ७ उमेदवार ८८२ मतदार आहेत. प्रभाग १४ मध्ये ४ उमेदवार ६१९ मतदार आहेत. प्रभाग १५ मध्ये ३ उमेदवार ५८२ मतदार आहेत. प्रभाग १६ मध्ये ३ उमेदवार ७२२ मतदार, प्रभाग १७ मध्ये २ उमेदवार असून, ५७७ मतदार आहेत. एकूण १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात असून, एकूण १२ हजार ४०६ मतदार आहेत.