‘व्हीटीएस’ प्रणाली सुरू करण्याबाबत अद्याप प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:52+5:302021-08-23T04:33:52+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. ...

‘व्हीटीएस’ प्रणाली सुरू करण्याबाबत अद्याप प्रतीक्षा
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. विभागातील ६५४ गाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. महामंडळाकडून एकाच वेळी सर्वत्र ‘व्हीटीएस’ यंत्रणा सुरू करण्यात येणार होती; परंतु तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू असल्याने प्रत्यक्ष यंत्रणा सुरू करण्यास विलंब होत आहे.
जिल्ह्यातील नऊ आगारांतील बसस्थानकातून ‘व्हीटीएस’ यंत्रणेसाठी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यंत्रणा सर्वत्र एकाच वेळी कार्यान्वित केली जाणार होती. मात्र, अद्याप यंत्रणा सुरू करण्यास विलंब होत असून केव्हा कार्यान्वित करणार, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना रत्नागिरी विभागाकडे प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विभागातील समस्त प्रवाशांमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवापर्यंत तरी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
‘व्हीटीएस’ यंत्रणेमुळे प्रवाशांना संबंधित एस.टी. कोणत्या भागातून धावत आहे. तिचे शेवटचे ठिकाण काय होते, संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे. विभागातील आतापर्यंत ६५४ गाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. रत्नागिरी आगारातील सर्वाधिक १२० गाड्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. लालपरीच्या प्रवाशांसाठी महामंडळाने एक ॲप विकसित केले आहे. ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना एका क्लिकवर त्यांना त्यांच्या गाडीचे ठिकाण मोबाइलवर समजू शकणार आहे. ॲप प्रवाशांसाठी तातडीने उपलब्ध करण्याबाबतची प्रतीक्षा आहे.
व्हीटीएस यंत्रणेचा मुहूर्त हुकला
‘व्हीटीएस’ यंत्रणा प्रवाशांसाठी फायदेशीर
‘व्हीटीएस’ यंत्र व डिस्प्ले बसविण्याचे काम पूर्ण
तांत्रिक बाबींमुळे यंत्रणा कार्यान्वित करण्यास विलंब
महामंडळाकडून अद्याप सूचना नाहीत
प्रवाशांमध्ये ‘व्हीटीएस’ प्रणाली सुरू करण्याबाबत उत्सुकता
प्रवाशांना एस.टी.चा नेमका ठावठिकाणा माहीत व्हावा, यासाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप सुरू असून महामंडळाच्या सूचनेनुसार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
- अनिल मेहत्तर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी.