महावितरणला देशपातळीवरील पुरस्कार
By Admin | Updated: November 20, 2015 00:07 IST2015-11-19T21:17:28+5:302015-11-20T00:07:16+5:30
ऊर्जा परिषदेत गौरव : ग्रीन ग्रीडसह बेस्ट स्टेट पॉवरने दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मानित

महावितरणला देशपातळीवरील पुरस्कार
रत्नागिरी : दिल्ली येथे आयोजित नवव्या भारतीय ऊर्जा परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पहिला क्रमांकाचा ग्रीन ग्रीड पुरस्कार तर द्वितीय क्रमांकाच्या बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंडिया चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या वतीने ऊर्जा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण अध्यक्ष मेजर सिंग, माजी अध्यक्ष एच. एल. बजाज, ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अनिल राजदान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरणचे संचालक अभिजीत देशपांडे, वीज खरेदी विभागाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, कार्यकारी अभियंता जितेंद्र फुले, मकरंद कुलकर्णी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
महाराष्ट्रात महावितरणने विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात लक्षणीय यश मिळवले आहे. सिंंगल फेजिंंग आणि गावठाण फिडर सेप्रेशन यामुळे सुमारे ५००० मेगावॅट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. तसेच ऊर्जा बचतीसाठी एल. ई. डी बल्बच्या वाटपासह विविध अभिनव उपक्रम महावितरणने यशस्वीपणे राबविले आहेत. त्यामुळे महावितरणला ग्रीन ग्रीड या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने परिषदेमध्ये गौरविण्यात आले.
त्याचबरोबर महावितरणतर्फे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात ग्राहकांसाठी सुविधा केंद्र, तक्रार निवारणासाठी २४ तास आॅनलाइन सुविधा, ग्राहकाभिमुख विविध अत्याधुनिक सेवा, वीजबिल भरण्यासाठी मोबाईल अॅपसह वेगवेगळे उपयुक्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत आराखड्याअंतर्गत मोठया प्रमाणात वीज वितरण प्रणालीची कामे झाली असल्याने महावितरणच्या ग्राहक सेवेचा दर्जादेखील उंचावला आहे. या सर्व बाबींची दखल घेत महावितरणला द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्य शासनाच्या भरीव सहकार्यामुळे भविष्यात ग्राहकांना आणखी वाजवी दरात वीज, कृषिपंपाना मोठ्या प्रमाणात वीजजोडणी व पायाभूत आराखड्याद्वारे वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जात असल्याचे संचालक अभिजीत देशपांडे यांनी हे पुरस्कार स्वीकाल्यानंतर सांगितले. (प्रतिनिधी)