राजकीय हस्तक्षेपाची साथ
By Admin | Updated: September 8, 2015 22:12 IST2015-09-08T22:12:25+5:302015-09-08T22:12:25+5:30
रत्नागिरी पालिका : दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचे प्रकार

राजकीय हस्तक्षेपाची साथ
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामात गेल्या काही काळापासून राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी बेजार झाले आहेत. कामाच्या वेळेत काही पदाधिकाऱ्यांचा सततचा हस्तक्षेप, विविध कामांसाठी सातत्याने वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. त्यामुळेच दैनंदिन काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ७ वाजेपर्यंत कार्यालयात थांबणे भाग पडत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठीच मतदारांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करीत असतात. त्यात काहीही गैर नाही. परंतु त्यातील काहीजण हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांसाठी सातत्याने वेठीस धरतात. त्यांच्याकडून ठराविक कामेच करून घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. विशेष करून नियमबाह्य कामांसाठीही त्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.दिवसभर अन्य कामात जुंपल्याने दैनंदिन कामकाज करणे अनेक कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. परिणामी ६ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असतानाही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करणे भाग पडत आहे.विकासाच्या कामांसाठी नगरसेवकांनी पालिकेत येणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटणे, त्यांच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करणे या गोष्टी कर्मचारी कधीही अमान्य करीत नाहीत. तो कामाचाच भाग आहे. परंतु हा पाठपुरावा जेव्हा काही नगरसेवक दिवसभर करतात, त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातातील दैनंदिन काम करणे अशक्य होते. तसेच काहीवेळा ठाण मांडून बसण्याच्या प्रकारामुळे काही प्रकरणे तपासून ती कागदपत्र मार्गी लावणे शक्य होत नाही. अशी कागदपत्र तपासण्याचा प्रयत्न केल्यास त्यात हस्तक्षेप केला जातो. त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अर्थातच काहीजणांच्या या दिवसभर ठाण मांडण्याच्या प्रकारांमुळे अन्य नगरसेवकही त्यात नाहक भरडले जात आहेत. (प्रतिनिधी)
नगरसेवकांमध्येही अस्वस्थता
पदाधिकाऱ्यांनी करावे कामाचे नियोजन
शहर विकासासाठी सर्वच प्रभाग हे महत्त्वाचे असून, समतोल विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्यत: दुपारच्या वेळेपर्र्यंत त्यांच्या प्रभागांबाबतची संबंधित कामे पूर्ण होतील, असे नियोजन केल्यास दुपारनंतरच्या वेळेत कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज पूर्ण करणे शक्य होईल व सायंकाळी उशिरापर्यंत थांबण्याचे दुष्टचक्र संपेल, अशीही चर्चा आहे.
अन्य नगरसेवकही त्रस्त
काही नगरसेवक हे आक्रमक भूमिका घेत आपल्याच प्रभागात कामगारांनी काम करण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे अन्य प्रभागातील कामावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. काही ठराविकच भागातील कामांसाठी पालिका आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे, तर सफाई, कचरा, गवत काढणी यांसारखी कामे वेळेत न होणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
कामचुुकारांनाही हवी शिस्त...
पालिकेतील काही विभागातील कर्मचारी हे कामचुकारपणा करण्यातही माहीर असल्याचे दिसून येत आहे. कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेत बसवण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांमुळे अनेकांचा कामचुकारपणाही प्रशासनाच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच अशा काही कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलवण्यात आले आहे.
हेतूबाबत संशय नको...
पालिकेतील काही महत्त्वाच्या विभागात कामाच्या फाईल्स तशाच पडून असतात. काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ होण्याचे प्रकारही घडतात, तर काही कागदपत्रांची पूर्तता होण्यात विलंब होतो. त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या हेतूबाबत संशयही निर्माण होत असून, कोणतेही कागदपत्रविषयक काम किती दिवसांनी होणार, याची नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना पालिकेचे उंबरठे सतत झिजवावे लागणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.