सेतू कार्यालयात दलालांचे राज्य...
By Admin | Updated: June 13, 2014 01:34 IST2014-06-13T01:31:22+5:302014-06-13T01:34:47+5:30
सामान्यांची परवड : निव्वळ दाखल्यांवर हजारोंची कमाई

सेतू कार्यालयात दलालांचे राज्य...
रत्नागिरी : येथील तहसिल कार्यालयात विविध दाखल्यांसाठी सध्या वाढती गर्दी आहे. मात्र, या कार्यालय परिसरात कार्यरत असलेले दलाल हजारो रूपये उकळून आपली चांदी करून घेत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांचा लगाम नसलेल्या या दलालांना सध्या चांगलेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांच्या सह्या व्हायच्या आहेत, असे सांगितले जात असतानाच या दलालांकडून हजारो रूपये पैसे देऊन काम करून घेणाऱ्यांना सह्या कशा लगेच मिळतात, असा सवाल होत आहे.
सध्या येथील सेतू कार्यालयात विविध परीक्षा आणि भरती यासाठी लागणारे विविध दाखले तसेच शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी दर दिवशी गर्दी होत आहे. यासाठी अनेकांनी दोन महिन्यापूर्वी या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, अधिकारी वर्गाची सही व्हायचीय, या कारणावरून बऱ्याचजणांचे दाखले या कार्यालयाकडे रखडलेले आहेत. काही वेळा अधिकारीच दौऱ्यावर आहेत, असे सांगून या लोकांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जात आहे.
मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी सेतू कार्यालयाला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी या कार्यालयाच्या समस्या समजून घेतानाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नागरिकांच्या दाखल्यांचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सेतू कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने चालला आहे. सेतूत सध्या आठ ते नऊ दलाल कार्यरत आहेत. ठराविक धनवान लोकांकडून त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे उत्त्पन्न मिळत आहे. त्यामुळे या दलालांचा हाच व्यवसाय झाला आहे. त्यांना काही शासकीय अधिकाऱ्यांचाही वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
सामान्य माणसाला अधिकारी दौऱ्यावर गेलेत, असे सांगितले जात असून त्यांच्या सहीसाठी हजारो दाखले रखडवून ठेवले जात आहेत. मात्र, काही ठराविक लोकांनाच दलालांबरोबरच काही शासकीय अधिकारीच सह्या मिळवून देत आहेत. त्यामुळे दौऱ्यांवर असलेले अधिकारी लगेचच कसे काय अवर्तीण होतात, असा सवालही केला जात आहे. सध्या सेतू कार्यालयात सामान्य माणसाची रखडपट्टी होत आहे. (प्रतिनिधी)