खेर्डीत लसीकरण उपकेंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:43+5:302021-05-23T04:30:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी गावची लोकसंख्या २० हजारांच्या घरात पोहोचली आहे. खेर्डीचे लोक अडरे येथे ...

खेर्डीत लसीकरण उपकेंद्र सुरू करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी गावची लोकसंख्या २० हजारांच्या घरात पोहोचली आहे. खेर्डीचे लोक अडरे येथे जातात. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणीप्रमाणे लसीकरण होत नाही. त्यामुळे खेर्डीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानुसार आमदारांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. सोमवारपर्यंत याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खेर्डी हे चिपळूण शहराच्या लगतचे मोठे गाव. एक पंचायत समिती गण म्हणजे खेर्डी गाव आहे. हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोडते; परंतु गावाची लोकसंख्या पाहता अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणीप्रमाणे लसीकरण होत नाही. त्यामुळे खेर्डीमध्ये लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. खेर्डी गावात औद्योगिक वसाहत असल्यामुळे बाहेरील कामगारांची ये - जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. खेर्डीत लसीकरण उपकेंद्र होणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात खेर्डीची लोकसंख्या पाहता आरोग्य विभागाकडून यापूर्वीच खेर्डीत लसीकरणाची सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. खेर्डीच्या लोकांना अडरेत जावे लागत असल्याने काहीसे संतापाचे वातावरण आहे. खेर्डीत लसीकरणासाठी आवश्यक त्या सुविधा आहेत. तिथे ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत. त्यामुळे खेर्डीत लसीकरणाची सुविधा करण्याची मागणी आमदार निकम यांच्याकडे केली.
यावर आमदार निकम यांनी तत्काळ जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोणत्याही स्थितीत दोन दिवसांत खेर्डी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी सूचना केली. यावर दोन दिवसांत निर्णय होईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. आमदार निकम यांच्यासह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर, राजेश सुतार, राकेश दाभोळकर, प्रणाली दाभोलकर, राशिदा चौगुले, प्रशांत दाभोळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.