सुधारित पाणी योजनेची चाचणी सुरु
By Admin | Updated: February 4, 2015 23:55 IST2015-02-04T21:40:57+5:302015-02-04T23:55:18+5:30
चिपळूण पालिका : योग्य पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजनांना गती

सुधारित पाणी योजनेची चाचणी सुरु
चिपळूण : नगर परिषद प्रशासनातर्फे नव्याने राबविण्यात येणाऱ्या सुधारित नळपाणी योजनेची विविध भागात चाचणी घेण्यात आली असून, काही ठिकाणी पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाईपलाईनला गळती लागते. ही बाब लक्षात आल्यानंतर आता संबंधित विभागातर्फे आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सुमारे सात वर्षांपूर्वी चिपळूण शहर व परिसरासाठी सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली. १२ कोटींची ही योजना आता अंदाजे १५ ते १६ कोटींवर गेली आहे. खेर्डी, गोवळकोट येथे पंप हाऊस असून, शहरातील विविध भागात या पाणी योजनेसाठी टाकण्यात येणारे पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या योजनेचे पाणी सुरु झाले असून, जादा दाबाने पाणी येत असल्याने विविध भागात पाईपलाईनला गळती लागण्याचे प्रकार वाढत आहेत. ही गळती काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना पाणी पुरवठा विभागातर्फे केली जात आहे. खेंड कांगणेवाडी येथेही टाकी बांधण्यात आली आहे. पाग येथेही पाण्याची टाकी बांधण्यात आली असून काही भागात या सुधारित नळपाणी योजनेचे पाणी सुरु करण्यात आले आहे. खेंड भागामध्ये आज मंगळवारी सुधारित नळपाणी योजनेचे पाणी सोडण्यात आले असता महालक्ष्मी नगर येथे पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे या पाईपलाईनमध्ये माती गेल्याने या भागात गढूळ पाणी पुरवठा झाला. तक्रारीनंतर योग्य पद्धतीने पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली. जुन्याच पाईपलाईनला सुधारित नळपाणी योजना जोडली गेल्याने काही ठिकाणी पाईपलाईनला गळती लागत आहे. (वार्ताहर)