राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:38+5:302021-09-04T04:37:38+5:30
रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या ...

राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरित सुरू करा
रत्नागिरी : राज्यातील शाळा व महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती मासुचे कोकण विभागप्रमुख, ॲड.गौरव शेलार यांनी दिली.
विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ओव्यांमधील ‘शुद्राचा‘ अर्थ महाराष्ट्रातील आजचे तरुण म्हणून घेत आहोत. कारण अविद्या काय करू शकते, हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे आणि त्यासाठी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांचा लढा किती उपयुक्त होता, हे संबंध देशाने अनुभवलेले आहे. आपणाला प्रबोधनकार यांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षणाचे महत्त्व आपण जाणून आहात. आता आपण हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठीही संबंधित मंत्रालयाला याबद्दल नियोजन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रत्यक्षात शिक्षण सुरू होणे निकडीचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहेत, ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क, विद्युत अडचणी, तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अत्याधुनिक मोबाइल नसणे, अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातीलही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जर शिक्षण व्यवस्था अशीच बंद राहिली, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षानी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठोपाठ दिल्ली व पुदुच्चेरी सरकारने शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र शासनानेही लवकरात लवकर यावर उपाय काढून शाळा व महाविद्यालय त्वरित सुुरू करावीत, अशी मागणी यात करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एका वर्गात १०० टक्के मुले हजर असतील, तर सकाळ सत्रामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावून दुपारच्या सत्रात निम्म्या विद्यार्थ्यांना बोलविता येईल. शाळा आणि महाविद्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी, जेणेकरून हळूहळू लसीकरणाचा टप्पा गाठून शाळा व महाविद्यालये १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असेही यात उपाय सुचविण्यात आले आहेत.