आंब्याच्या मोहोर प्रक्रियेला प्रारंभ

By Admin | Updated: November 8, 2015 23:42 IST2015-11-08T20:38:47+5:302015-11-08T23:42:28+5:30

अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गे

Start of mangrove process | आंब्याच्या मोहोर प्रक्रियेला प्रारंभ

आंब्याच्या मोहोर प्रक्रियेला प्रारंभ

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या चार दिवसात पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. परंतु आंब्यावरील मोहोर प्रक्रियेस प्रारंभ झाल्यामुळे बागायतदार मात्र सुखावला आहे.
आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीला सुरुवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस सुरुवातीपासून लांबला. साधारणत: सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किरकोळ स्वरूपात का होईना मोहोराला प्रारंभ झाला आहे. यावर्षी पावसाळ्यातही उन्हाळा अनुभवला आहे. अद्याप कडक ऊन कोसळत आहे. त्यामुळे आलेला मोहोर सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारच्या कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. परंतु ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने सकाळचे ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडी सुरू होण्याची आशा आहे. त्यामुळे तद्नंतर मोठ्या प्रमाणावर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी मार्चपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येऊन फळधारणाही बऱ्यापैकी झाली होती. परंतु अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गेले होते. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे झाडांना पालवी आली नाही. परिणामी मोहोर प्रक्रिया लवकर सुरू झाली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चतम तापमान यामुळे होणारी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबापीक विमा योजना सुरू केली. प्रायोगिकतत्त्वावर तीन वर्षांपूर्वी विमा योजना सुरू केली. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अद्याप त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत.(प्रतिनिधी)


यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापरही फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून मोहोर वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचा तोटा भरून निघावा, अशी अपेक्षा आहे.
- एम. एम. गुरव, शेतकरी

Web Title: Start of mangrove process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.