‘रॉयल’बाबत विधानसभेत तारांकित प्रश्न
By Admin | Updated: July 24, 2015 00:42 IST2015-07-23T21:59:23+5:302015-07-24T00:42:31+5:30
गुहागर तालुका : माहिती मागवल्याने महसूलची धावपळ

‘रॉयल’बाबत विधानसभेत तारांकित प्रश्न
गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या रॉयल अपार्टमेंटबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न केल्याने महसूल खात्याची चांगलीच धावपळ उडाली आहे. जिल्हाधिऱ्यांनी गुहागर महसूल प्रशासन व निबंधक कार्यालयाकडून माहिती मागवली आहे.
शृंगारतळी येथे रॉयल अपार्टमेंटमध्ये दोन इमारतीमधील एकाच इमारतीसाठी अधिकृत टाऊन प्लॅनिंगची परवानगी घेतली असताना दोन इमारतीमधील रुम विकताना व आवश्यक परवानगी घेताना निबंधक कार्यालयाकडे खरेदीखत व्यवहारासाठी एकच एनए आॅर्डर जोडून संबंधित इमारतमालकाने महसूल व निबंधक कार्यालयाची फसवणूक केली. याबाबत विकत घेतलेल्या सदनिकाधारक व इमारत मालक यांच्यामध्ये सांडपाण्याची सुविधा व शौचालय टाकीवरुन वाद वाढून यामधून एक इमारत चुकीच्या पद्धतीने अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत सदनिकाधारक इम्रान घारे व इतर सहकाऱ्यांनी हा विषय महसूल व पंचायत समित प्रशासनाकडे गेली काही महिने लावून धरला होता. स्थानिक ग्रामपंचायत मात्र याबाबत कोणतेच सहकार्य करत नव्हती. अशावेळी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे हा विषय मांडल्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न केला. यातून आता महसूल प्रशासन निबंधक कार्यालय व ग्रामपंचायतीकडून या इमारतीसाठी दिलेल्या परवानग्या योग्य की अयोग्य याबाबत सखोल चौकशी सुरु झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार तडवी, मंडळ अधिकारी व मुख्य लिपिक यांना तातडीने बोलावून सर्व आढावा घेतला जात आहे. यामध्ये जिल्हाधिकारी काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. याबाबत सदनिधारकांनी महसूल व पंचायत समिती प्रशासनाकडे प्रश्न लावून धरला होता. आता जाधव यांनी त्यात लक्ष घातले आहे. (प्रतिनिधी)