स्थायी समिती सभा गाजणार
By Admin | Updated: November 30, 2015 01:09 IST2015-11-30T00:23:28+5:302015-11-30T01:09:32+5:30
जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुध्द पदाधिकाऱ्यांचे बंड

स्थायी समिती सभा गाजणार
रत्नागिरी : मागील चार महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभेतील निर्णयांची तड लावण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यामुळेच स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र, तहकूबीनंतर पुन्हा होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व सदस्यांच्या आक्रमकतेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना सामोरे जावे लागणार आहे.
देशभ्रतार यांच्या कार्यपध्दतीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्वच पदाधिकारी व स्थायी समितीच्या सदस्यांकडून नाराजी व्यक्त व्यक्त करण्यात आली आहे.
जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची पूर्तता करण्याची देशभ्रतार यांची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे एकूण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागाचा विकासच ठप्प झाल्याचे अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी सांगितले.
स्थायी समितीच्या मागील इतिवृत्तातील सुमारे ६३ विषयांवर घेतलेल्या निर्णयांची प्रशासनाने अंमलबजावणी करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत प्रशासनाने काहीही कार्यवाही केलेली नसल्याने हे निर्णय तडीस गेले नसल्याचे सभेमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांनी समोर आणले. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या आक्रमकतेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सामोर जावे लागले.
स्थायी समितीच्या मागील चार सभांमध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये शिक्षकांच्या पदावनतीचा निर्णय, पदवीधर शिक्षकांना बी. एड. पदवी प्रवेशासाठी मान्यता देण्यासही प्रशासन मागे राहिले आहे. आंतर जिल्हा बदलीचा प्रश्नही प्रशासनाकडून जैसे थे ठेवण्यात आलेला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम तयार असतानाही त्याची प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे केवळ प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामीण जनतेच्या रोषाला पदाधिकारी व सदस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा शब्दांत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्य पद्धतीबाबत सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे चालू आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत विकासकामांवरून सदस्य आक्रमक होणार हे निश्चित आहे. त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी कशा प्रकारे तोंड देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)
प्रेरणा देशभ्रतार : सदस्य आक्रमक होणार?
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेच्या सदस्यांची नाराजी आहे. देशभ्रतार या विकासकामात सहकार्य करत नसल्याचा या सदस्यांचा आरोप असून, या प्रकरणामुळे सध्या जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापले आहे.
आमदारांनी घातले लक्ष
स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी आणि सदस्य प्रशासनाविरूध्द आक्रमक होण्याची शक्यता असून, आमदार राजन साळवी यांनीही यामध्ये लक्ष घातल्याने हा विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे.