डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहू

By Admin | Updated: October 9, 2015 22:59 IST2015-10-09T22:59:34+5:302015-10-09T22:59:34+5:30

गुरूनाथ पेडणेकर : आरोग्य अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी त्रास देणे चुकीचे

Stand by the doctor | डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहू

डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहू

सिंधुदुर्गनगरी : आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. जाधव यांना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्रास होऊ लागल्याने रजेवर गेले असल्याने आंबोलीत रुग्णांचे हाल होत आहेत. हा मुद्दा सभेत चर्चेला आला असता आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये गेल्या पाच वर्षात ९ डॉक्टर बदलून गेले आहेत. डॉक्टरांना लोकप्रतिनिधींनी त्रास देणे चुकीचे आहे. असे असेल तर आम्ही ठामपणे डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समिती सभेत डॉक्टरांना दिला.
जिल्हा परिषदेची आरोग्य समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभुगांवकर, जान्हवी सावंत, निकिता जाधव, भारती चव्हाण, समिती सचिव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये डॉक्टर रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी करत नसल्याचा आरोप तेथील एका लोकप्रतिनिधींनी करत त्या डॉक्टराला जाब विचारला होता. या प्रकरणाचा ‘त्या’ डॉक्टरास मानसिक त्रास झाल्याने त्याने तो डॉक्टर रजेवर गेला आहे. याबाबत समिती सभेत चर्चा करण्यात आली. सध्या आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्णांचा ओढा वाढला असून तेथे डॉक्टर नसल्याने आता रुग्णांचे हाल होत आहेत. काम करणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण किंवा लोकप्रतिनिधी त्रास देत असतील तर योग्य नाही. डॉक्टरही सेवाभावी वृत्तीने काम करतात. डॉक्टरांना स्थानिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून संरक्षण मिळाल्यास डॉक्टरांचीही काम करण्याची मानसिकता राहील असे डॉ. योगेश साळे यांनी सभागृहात स्पष्ट केले. यावर बोलताना सभापती पेडणेकर म्हणाले, जाणूनबुजून लोकप्रतिनिधीनी डॉक्टरांना त्रास देणे योग्य नाही. असे प्रकार जिल्ह्यात घडत असतील तर आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी आहोत असे सांगितले.
प्राथमिक आरोग्यकेंद्र बांदा येथे काहीजणांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. तसेच त्या आवारात दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी आरोग्यकेंद्रात नेताना त्रास होत आहे. या प्रकरणाकडे वारंवार लक्ष वेधूनसुद्धा यात काहीच फरक न पडल्याने समितीच्यावतीने नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देणार असल्याची माहिती सदस्य प्रमोद कामत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने लहान जिल्हा असल्याने याठिकाणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट्य कमी करून द्यावे असा ठराव आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार आरोग्य विभागाचे असलेले कुटुंब नियोजनामध्ये उद्दिष्ट्य १३०० ने कमी करून २०९५ एवढे देण्यात आले. असे असले तरी कमी असलेले उद्दिष्ट्य जिल्हा शल्य चिकित्सकांना वाढवून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. (प्रतिनिधी)


नामदेव सोडल : डेंग्यूचा एकही बळी नाही
जिल्ह्यातील तापाच्या साथीचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत डेंग्यूचे ६० तर मलेरियाचे ९४ रुग्ण उपचाराखाली आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत डेंग्यूच्या तापाने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल यांनी दिली.


नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात होणार नोकर भरती
जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या रिक्त पदांसाठी नोव्हेंबरअखेरपर्यंत भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आरोग्य विभागातील आरोग्यसेवक, सेविका, औषध निर्माता व वर्ग चार (शिपाई) पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती डॉ. योगेश साळे यांनी दिली.



योगेश साळेंचे विशेष अभिनंदन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योेगेश साळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या आरोेग्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न केले. यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्य प्रमोद कामत यांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Web Title: Stand by the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.