चिपळुणातील ‘एसटी’ पुन्हा जुन्या वळणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:02+5:302021-08-14T04:37:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुरात कोट्यवधीचे नुकसान झालेल्या चिपळूण आगाराच्या तब्बल ३७० ई-तिकीट मशीनही पाण्यात गेल्याने त्या पूर्णत: ...

चिपळुणातील ‘एसटी’ पुन्हा जुन्या वळणावर
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरात कोट्यवधीचे नुकसान झालेल्या चिपळूण आगाराच्या तब्बल ३७० ई-तिकीट मशीनही पाण्यात गेल्याने त्या पूर्णत: बिघडल्या आहेत. या मशीन बिघडताच यावर उपाय म्हणून काळानुसार कालबाह्य ठरलेल्या ट्रे तिकिटाचा पर्याय पुन्हा आगाराने शोधला आहे. दरम्यान, ट्रे तिकीटही पाण्यात गेल्याने ते अन्य ठिकाणाहून तिकीट ब्लॉक मागविले जात आहेत.
हाहाकार माजविलेल्या महापुरामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले असतानाच याचा सर्वाधिक फटका चिपळूण आगाराला बसला आहे. यात केवळ आगारप्रमुखांनी वाचविलेली ८ लाखांची रक्कम वगळता सर्वच साधनसामग्री पाण्याखाली गेली आहे. आजही यंत्रणेअभावी आगार प्रशासनाचा कारभार नियमित झाला नसला, तरी त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसे पाहिल्यास प्रवाशांना झटपट तिकीट देता यावे यासाठी एस. टी. महामंडळ तिकीट पद्धतीत बदल करून जुन्या ट्रे तिकिटाऐवजी नव्या अत्याधुनिक स्वरुपातील ई-तिकीट मशीनद्वारे प्रवासी तिकिटे देण्यास सुरुवात केली. पुढे याच पद्धतीचा सर्रास वापर होऊ लागल्याने परिणामी काळाच्या ओघात ट्रे तिकीट अखेर कालबाह्य ठरू लागले. तसे पाहिल्यास अधून-मधून याचा वापर होत असला तरी तो क्वचितच आहे. असे असताना याच कालबाह्य ट्रे तिकीटचा वापर आता महापुरानंतर नव्याने करण्यास सुरुवात झाली आहे.
या महापुरात एस.टी. आगाराचे कोट्यवधीचे नुकसान झाले असतानाच यात एसटीच्या तब्बल ३७० ई-तिकीट मशीन पाण्यात गेल्या. यामुळे बिघडलेल्या या मशीन कधी दुरुस्त होणार, हा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. त्यादृष्टीने आगार प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी महापुराची झळ बसूनही प्रवाशांच्या सेवेसाठी आगाराने काही फेऱ्या सुरू केल्या आहेत. सुरू झालेल्या फेऱ्यांसाठी प्रवासी तिकीट देण्यासाठी आता ट्रे तिकीटचा पर्याय आगाराने शोधला आहे. तसे पाहिल्यास ट्रे तिकीटमधील काही तिकिटेही महापुरामुळे भिजली असून, त्याचा पंचनामा आगार प्रशासनाने सुरु केला आहे. अन्य ठिकाणाहून हे तिकीट ब्लॉक मागविले जात असून, त्यावरच आगाराचा प्रवासी सेवेचा कारभार चालत आहे.