एस.टी. प्रशासनाचा फुकट्यांना दणका
By Admin | Updated: May 22, 2015 00:15 IST2015-05-21T22:38:31+5:302015-05-22T00:15:57+5:30
कडक कारवाई : पंचेचाळीस हजाराचा दंड वसूल

एस.टी. प्रशासनाचा फुकट्यांना दणका
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली असल्याने तिला जीवनवाहिनी असे संबोधण्यात येत आहे. प्रवास करताना वाहकाची नजर चुकवून प्रवास करणारे फुकटे प्रवासी अनेकवेळा तिकिट तपासनिसांच्या सापळ्यात सापडतात. वर्षभरात रत्नागिरी विभागात ११४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४५ हजार ६८२ रुपयांच्या दंडासह तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागांतर्गत नऊ आगार असून, सातत्याने संपूर्ण विभागांतर्गत तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात येते. राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी विभागामध्ये फुकट प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. परंतु दरमहा ही मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात तिकीट तपासनीस अनेकवेळा एखाद्या ठिकाणी मध्येच एस. टी.मध्ये चढून तिकीटांची तपासणी करतात. एस. टी.ने ही धडक मोहीम सुरू ठेवली आहे.
तिकिटाची रक्कम ५० रुपये असेल तर १०० रुपये दंड व तिकिटाची रक्कम तिकीट न काढणाऱ्या व्यक्तीकडून वसूल केली जाते. त्याचबरोबर ५१ रुपयांच्या पुढे तिकीट असेल तर मात्र दंडाची रक्कम १०० रुपयांच्या दुप्पट होते. तसेच दंड रकमेसह तिकिटाची रक्कमही वसूल करण्यात येते.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. गेल्या महिन्यात चार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन ३४९६ रुपये वसूल करण्यात आले आहेत. दंड आकारताना प्रवाशाने चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक्त त्या भाड्याची दुप्पट आणि शंभर रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती दंड म्हणून आकारण्यात येते. (प्रतिनिधी)