पोफळी-कोंड फणसवणे पूल वाहतुकीसाठी खुला
By Admin | Updated: June 24, 2014 01:42 IST2014-06-24T01:23:50+5:302014-06-24T01:42:51+5:30
भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन

पोफळी-कोंड फणसवणे पूल वाहतुकीसाठी खुला
चिपळूण : कोयना पाटबंधारे विभागातर्फे सोमवारी पोफळी-कोंड फणसवणे कुंभार्ली गावांना जोडणाऱ्या पुलाची चाचणी घेण्यात आली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कोंडफणसवणेचे माजी सरपंच मधू इंदुलकर यांनी पत्रकारांना दिली.
कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ठिगळे, उपअभियंता गवळी, शाखा अभियंता टी. एल. देसाई यांच्या उपस्थितीत सोमवारी पुलाची चाचणी घेण्यात आली. पुलाच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव व जलसंपदामंत्री तटकरे दोघांनी प्रयत्न केले. चार महिन्यांपूर्वी जलसंपदामंंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करताना प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना आयोजकांनी डावलले होते. मात्र, पुलाचे भूमिपूजन करणाऱ्या आयोजकांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. चिपळूणचे माजी आमदार निशिकांत जोशी यांनी १९८६ मध्ये बांधलेला हा पूल जुलै २००५ च्या महापुरात धोकादायक झाला होता. पाटबंधारे विभागाने या पुलाची दुरुस्ती केली आहे. कोयना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून किरकोळ कामे पूर्ण करून घेत आज हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. प्रथम शासनाच्या गाड्यांचा ताफा या पुलावरून गेल्यानंतर जे.सी.बी.आणि माल वाहतुकीचे डंपर नेण्यात आले. पोफळी, कोंड फणसवणेसह कुंभार्लीतील ग्रामस्थांना या पुलाचा लाभ फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)