खर्च लाखोंचा; थेंब नाही पाण्याचा
By Admin | Updated: August 7, 2014 00:13 IST2014-08-06T21:25:53+5:302014-08-07T00:13:21+5:30
जैतापूर आरोग्यकेंद्र : कोणालाच सोयरसुतक नाही

खर्च लाखोंचा; थेंब नाही पाण्याचा
जैतापूर : पाण्याचा विषय काढला की, डोळ्यातून पाणी येईल. पण, नळपाणी योजनेतून काही येणार नाही, असे सध्या ग्रामीण भागात म्हटले जात आहे. याची तंतोतंत प्रचिती जैतापूरमध्ये येत आहे. सुमारे १९ लाख रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूरला पाणीपुरवठा योजना राबवली. मात्र, या योजनेचे थेंबभर पाणी गेल्या आठ वर्षांत आरोग्य केंद्राला न मिळाल्याने कर्मचारी व रुग्णांची पाण्यासाठी वणवण संपलेली नाही.
जैतापूर आरोग्य केंद्र (ता. राजापूर) हे परिसरातील सामान्य रुग्णांवरील प्राथमिक उपचारासाठी मोठे आशास्थान आहे. मात्र, येथे रुग्णाला नेल्यास त्याचा उपचाराअभावी नाही तर पाण्याअभावी मृत्यू ओढवू शकतो. कारण १९ लाख रूपये खर्च झाले तरी पाण्याचं स्वप्न काही सत्यात उतरलेलं नाही.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा तत्कालीन उपाध्यक्ष विलास अवसरे, दळेचे त्यावेळचे उपसरपंच महेश करगुटकर, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी महेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत होळी गावात एकनाथ राजू गुरव यांच्या जमिनीत योजनेसाठीच्या विहिरीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. माजी उपसरपंच महेश करगुटकर नवीन कार्यकारिणीत सरपंचपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी ही योजना ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील पाणी समस्या संपलेली नाही.
हे आरोग्य केंद्र ग्रामपंचायत, दळेच्या कार्यक्षेत्रात येते. एकनाथ गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या नावे बक्षीसपत्राने विहिरीसाठी जमीन विनामोबदला दिली आहे.
१९ लाखाची ही नळपाणी योजना असताना मक्तेदाराने दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकले. काही लाईन सहा इंच खोलीच्या कातळावर चर मारुन टाकली व पैसे वाचवले. विहीर बांधून तयार आहे. विजेचा खांब विहिरीजवळ आहे. तरीही विहिरीवर पंप बसलेला नाही. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एवढा पैसा ओतूनही पाणी न आल्याचे कोणालाच सोयरसुतक नाही. त्यामुळे हे १९ लाख रुपये नेमके जिरले कुठे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्राबाबत सामान्यांचे राहोच, पण लोकप्रतिनिधीही किती उदासिन आहेत, हेच या घटनेवरून दिसून येते. आरोग्य केंद्रासाठी १९ लाखांचा निधी खर्चूनही पाण्याचा एक थेंब येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आमदारांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत कोणालाच या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने रुग्णांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
-अजूनही पाण्याची समस्या कायमच.
-विहीर बांधून पूर्ण, विजेचे खांबही तयार. मात्र विहीरीवर पंपच बसवलेला नाही.
-दळे येथील एकनाथ गुरव यांनी विहीरीसाठी दिली विनामोबदला जागा.
-पाण्यासाठी करावी लागतेय -मक्तेदाराने पैसे वाचवण्यासाठी दळे नळपाणी योजनेच्या चरातच पाईपलाईन टाकली.