माजी सैनिकांसाठी विशेष मेळाव
By Admin | Updated: January 14, 2015 23:37 IST2015-01-14T20:47:27+5:302015-01-14T23:37:52+5:30
तीन ठिकाणी आयोजन : एकाच ठिकाणी मिळणार आधार, पॅनकार्डे

माजी सैनिकांसाठी विशेष मेळाव
रत्नागिरी : माजी सैनिकांना सोयी, सवलती, आर्थिक मदत घेण्यासाठी आधारकार्ड तसेच सैन्य सेवा पेन्शनसाठी बँकेच्या खात्याशी आधारकार्ड व पॅनकार्ड जोडणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जिल्ह्यात खेड, रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिकांना शासनाच्या माध्यमातून आणि सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून मिळणाऱ्या सोयी, सवलती, आर्थिक मदत घेण्यासाठी आधारकार्ड तसेच सैन्य सेवा पेन्शनसाठी बँकेच्या खात्याशी आधारकार्ड व पॅनकार्ड जोडणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक, विधवा व अवलंबित यांना आधारकार्ड व पॅनकार्ड काढण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यात विशेष माजी सैनिक मेळावे (आधार, पॅनकार्ड कॅम्प) आयोजित करण्यात आले आहेत. आधार, पॅनकार्ड नोंदणीसाठी मंगळवार, दिनांक २० रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह खेड, बुधवार २१ रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण. गुरुवार २२ रोजी सकाळी १० वाजता माजी सैनिक विश्रामगृह, रत्नागिरी येथे विशेष माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत आधारकार्ड तसेच पॅनकार्ड काढणारे पथक त्यांच्या आवश्यक सामुग्रीसह उपलब्ध राहणार आहे. आधारकार्ड (मोफत) काढण्यात येणार असून, पॅनकार्ड मात्र १२० रुपयांत काढून देण्यात येणार आहे. आधारकार्ड काढायला येताना, सोबत आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून रेशनकार्ड, जन्मतारखेचा पुरावा म्हणून एसएससी प्रमाणपत्र, जन्मदाखला, विवाह नोंदणी दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, त्याचबरोबर सध्या राहत असलेल्या पत्त्याचा पुरावा (लाईटबिल, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना आदी) घेऊन येणे आवश्यक आहे.
माजी सैनिकांनी मेळाव्यास उपस्थित राहून, त्यांच्या आधारकार्डची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे करणे आवश्यक आहे. माजी सैनिकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)