परिचारिकांच्या कामाचे विशेष काैतुक : बाळ माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:31+5:302021-05-12T04:32:31+5:30
रत्नागिरी : शिक्षण पूर्ण होण्याआधीच कोरोनासारख्या महामारीविरूद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत काम करण्याचे धाडस परिचारिका दाखवत आहेत. हे काम कौतुकास्पद ...

परिचारिकांच्या कामाचे विशेष काैतुक : बाळ माने
रत्नागिरी : शिक्षण पूर्ण होण्याआधीच कोरोनासारख्या महामारीविरूद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत काम करण्याचे धाडस परिचारिका दाखवत आहेत. हे काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार माजी आमदार आणि यश फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळ माने यांनी लोकमतशी बोलताना काढले. यश फाऊंडेशनमध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तब्बल ६२ परिचारिका कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत आहेत.
मुळात रत्नागिरी जिल्ह्यात पॅरामेडिकल स्टाफ कोरोना येण्याच्या आधीपासूनच कमी आहे. गतवर्षी कोरोनाने थैमान घालूनही तो भरण्याला सरकारने प्राधान्य दिलेले नाही. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यानंतर सरकारला जाग आली आहे. याबाबत आपण महिनाभर पाठपुरावा करत होतो. मात्र प्रतिसादच मिळत नव्हता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय क्षेत्रात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्यांना आरोग्य यंत्रणेत सामावून घेण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर पुढील हालचाली सुरू झाल्या, असे ते म्हणाले.
रत्नागिरीत महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड वाढवण्यात आले. मात्र त्यासाठी परिचारिकांचा प्रश्न होताच. शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या परिचारिकांना सामावून घेण्याला दुजोरा मिळाल्याने आपण पुन्हा आराेग्य यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर यश फाऊंडेशनमधील ६२ आणि परकार नर्सिंग स्कूलमधील १८ परिचारिकांना आरोग्य यंत्रणेने सामावून घेतले, असे ते म्हणाले.
आरोग्य क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या संस्थांची ही सामाजिक बांधिलकी आहे. कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना जी जी मदत करणे शक्य आहे, ती प्रत्येक जबाबदारी घेण्यासाठी प्रत्येकानेच पुढे यायला हवे, याच हेतूने आपण यात पुढाकार घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
यश फाऊंडेशनचे जवळपास दोन हजाराहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी आज आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. आता विविध अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणारी ६२ मुले कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत आहेत. या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आपल्याला विशेष कौतुक वाटते. कोरोनाबाबतची भीती वाढत असताना शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांनी या कामाला तत्काळ होकार दिला आणि काम सुरुही केले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
..............
राहण्याची व्यवस्था
या मुलांपैकी बहुतांशजण भाड्याच्या जागेत राहत होते. मात्र ही मुले कोविड सेंटरला काम करणार म्हणून त्यांना जागा सोडायला सांगितली गेली. हे ऐकून वाईट वाटले. या नर्स किंवा ब्रदर्स रत्नागिरीसाठीच काम करत आहेत. सामाजिक दायित्त्व म्हणून त्यांना पाठिंबा द्यायला हवा. ते न करता त्यांच्यावर अन्यायच झाला. पण रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सतीश शेवडे आणि शिल्पा पटवर्धन यांनी पुढे येत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात या मुलांची राहण्याची सोय केली. त्यांच्या जेवणाचा प्रश्न जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोडवला, असे माने यांनी आवर्जून सांगितले.
.....................
आईची सेवा करता आली नाही
आमदार असतानाच माझी आई गेली. तिची सेवा करता आली नाही. अशी सेवा देण्यासाठी काही ना काही व्यवस्था असायला हवी, हे सारखे मनात येत होते आणि त्यातून नर्सिंग महाविद्यालयाची कल्पना आकाराला आली. त्यासाठी अनेकांनी खूप मोठे सहकार्य केले. त्यामुळेच आज रत्नागिरीसाठीची परिचारिकांची गरज भागवता आली, असे बाळ माने यांनी सांगितले.