मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:47+5:302021-09-03T04:32:47+5:30
खेड : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण ...

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
खेड : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती २६४ गुहागर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना सोनोने यांनी सांगितले की, दि. ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दुबार अथवा समान नोंदी कमी करणे, एकापेक्षा अधिक नोंदी असलेल्या नोंदी कमी करणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्रांची पडताळणी करणे, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील, असे मतदार तसेच ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ला अठरा वर्ष पूर्ण होतील, असे सर्व पात्र नागरिक नाव नोंदणीसाठी विहीत नमुन्यात अर्ज करु शकतील. तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.
तसेच संबंधित बीएलओ यांच्याकडेदेखील अर्ज सादर करता येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. तसेच ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी दोन विशेष मोहिमांचे आयोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वतः हजर राहून अर्ज व छायाचित्र स्वीकारण्याची कार्यवाही करणार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.